-१५२ व्या जयंतीनिमित्त शिस्तबद्ध आयोजन; शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बुलढाणा (महेंद्र हिवाळे) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच सम्यक समन्वय समितीच्या वतीने भव्य आणि शिस्तबद्ध मिरवणुकीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या मिरवणुकीला बुलढाणा शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटना, बहुजनवादी व आंबेडकरवादी विचारधारेतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माणगाव परिषदेत केलेल्या, “एक वेळ माझा जन्मदिवस साजरा करू नका, पण राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती सणाप्रमाणे साजरी करा,” या विचाराला अभिवादन करत हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. सामाजिक न्याय, शिक्षण, शेती, आरक्षण आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी उल्लेखनीय कार्य करणारे लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचा जागर करण्याच्या उद्देशाने सम्यक समन्वय समितीने शहरातील विविध समविचारी संस्था, संघटना आणि प्रतिष्ठित नागरिकांना या मिरवणुकीत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. मिरवणुकीची सुरुवात जयस्तंभ चौकातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. यशसिद्धी सैनिक सेवा संघाच्या जवानांनी मानवंदना दिल्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ झाला.
ढोल-ताशा पथक, लेझीम पथक, यशसिद्धी सैनिक सेवा संघाचे जवान, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची प्रतिमा असलेला सुशोभित रथ तसेच मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिला व पुरुष यांच्या उपस्थितीमुळे मिरवणुकीला आकर्षक स्वरूप प्राप्त झाले. “बहुजनवादी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. जयस्तंभ चौकातून सुरू झालेली मिरवणूक एसबीआय चौक मार्गे आयडीबीआय चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचली.
तेथे सैनिकांनी मानवंदना दिली, उपस्थितांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. अल्पावधीत नियोजन करूनही अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या मिरवणुकीचे शहरभर कौतुक होत आहे. शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम होत असले, तरी बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच अशा स्वरूपाची भव्य मिरवणूक आयोजित करण्याचा मान सम्यक समन्वय समितीला मिळाला आहे. या यशस्वी आयोजनासाठी समितीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहभागी संस्थांनी विशेष परिश्रम घेतले.