– ज्येष्ठ नेते शेनफडराव घुबे यांचे खडकपूर्णा थकबाकीदारांना खडे बोल; स्मारकासाठी मोठ्या आर्थिक मदतीची ग्वाही!
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) : ‘खडकपूर्णा’चे जनक स्व. भारतभाऊ बोंद्रे यांचे स्मारक उभारताना ती श्रद्धांजली केवळ पुतळ्यापुरती मर्यादित न राहता, त्यांच्या स्वप्नपूर्तीतून व्यक्त व्हावी. धरणाचे पाणी वापरूनही त्याची पट्टी न भरता स्मारकासाठी वर्गणी मागण्याचा नैतिक अधिकार आपल्याला आहे का? अशा स्पष्ट शब्दांत ज्येष्ठ नेते शेनफडराव घुबे यांनी थकबाकीदार शेतकऱ्यांना फटकारले आहे. घुबे यांच्या या रोकठोक भूमिकेमुळे परिसरात सध्या चर्चेला उधाण आले आहे.
देऊळगाव घुबे येथे स्व. भारतभाऊंचा पुतळा उभारण्यासंदर्भात २१ एप्रिल रोजी ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर घुबे यांनी स्थानिक भावनांना वाट करून देतानाच वास्तवतेचे आरसे दाखवले. खडकपूर्णा प्रकल्पासाठी भाऊंनी आयुष्य वेचले, मात्र पाणी शिवारापर्यंत पोहोचूनही ते भरण्याबाबत असलेली अनास्था क्लेशदायक असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
“पुतळ्याच्या नावाने केवळ अश्रू ढाळणे आणि त्यांनी दिलेल्या पाण्याचा कर न भरणे, ही बाब त्यांच्या विचारांशी प्रतारणा करणारी आहे,” असे सांगत घुबे यांनी गावकरी आणि प्रतिष्ठित नागरिकांना आधी थकीत पाणीपट्टी भरण्याचे आवाहन केले. “आधी थकीत देणी देऊन आदर्श निर्माण करा, तरच जनतेकडे वर्गणी मागण्यासाठी आपण नैतिकदृष्ट्या पात्र ठरू,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.
स्मारकाला बळ, पण शिस्तीची जोड
स्मारक उभारणीसाठी आपला आर्थिक वाटा सर्वाधिक असेल, अशी ग्वाही देतानाच त्यांनी सर्व स्तरांतील नागरिकांची समिती स्थापन करण्याची सूचना केली. स्व. भारतभाऊंना खरी श्रद्धांजली ही केवळ पाषाणाच्या पुतळ्यात नसून, त्यांनी दिलेल्या पाण्याचा सन्मान करून शेती समृद्ध करण्यात आहे, असा संदेश त्यांनी ग्रामस्थांना दिला.
वास्तव : सिंचन असूनही ‘कोरड’
खडकपूर्णा प्रकल्पाची आकडेवारी पाहता, सिंचनाबाबतची अनास्था स्पष्टपणे समोर येते:
- सिंचन क्षमता: ११,५०० हेक्टर (टप्पा १ ते ४)
- प्रत्यक्ष वापर: केवळ ५,००० हेक्टर
- दुर्दशा: तब्बल ६,००० हेक्टर क्षेत्राचे हक्काचे पाणी केवळ उदासीनतेमुळे नदीपात्रात सोडून दिले जाते.
- थकबाकी: एकूण पाणीपट्टी वसुली ३० टक्क्यांच्या आत असून, देऊळगाव घुबे येथील ‘वसुंधरा पाणी वापर संस्थे’ची ३५ टक्के वसुली अद्याप बाकी आहे.