– स्थानिक विरुद्ध बाहेरचा मुद्दा कळीचा!; बाहेरील उमेदवार चिखलीची जनता स्वीकारणार का?
चिखली/बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) : अद्याप बराच वेळ असला तरी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आतापासूनच जोरदार राजकीय रणनीती आखण्यास सुरुवात केली असून, चिखली मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यांचे सुपुत्र आणि नगरपालिकेचे गटनेते मृत्युंजय गायकवाड यांनी चिखली मतदारसंघात आपला जनसंपर्क वाढवल्याने विद्यमान आमदार श्वेताताई महाले यांच्यासमोर नवे राजकीय आव्हान उभे राहण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे, सुख-दुःखाच्या प्रसंगात थेट मतदारांच्या दारात पोहोचून मृत्युंजय गायकवाड यांनी चिखलीत मोठी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र आहे. तथापि, चिखली मतदारसंघातील जनता हा ‘बाहेरील’ उमेदवार स्वीकारणार का, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून मृत्युंजय गायकवाड यांनी चिखली मतदारसंघातील गावांचा झंझावाती दौरा सुरू केला आहे. सोमवारी (२० एप्रिल) त्यांनी केसापूर आणि पिंपळगाव सराई या गावांना भेटी देऊन जनसंपर्क मोहिमेवर भर दिला. केसापूर येथे मदन राजाराम बिल्लारी यांच्या गुरांच्या कोठ्याला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले होते. या घटनेची माहिती मिळताच गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कुटुंबाचे सांत्वन केले. केवळ सांत्वनच नव्हे, तर प्रशासकीय यंत्रणेला तत्काळ दूरध्वनी करून आर्थिक मदतीसाठी पाठपुरावा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
केवळ आपत्तीग्रस्तांच्या भेटीच नव्हे, तर धार्मिक आणि घरगुती सोहळ्यांच्या माध्यमातूनही मृत्युंजय गायकवाड मतदारांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत. चिखलीतील राजे संभाजीनगर येथील श्री मुंगसाजी माऊली मंदिरात पार पडलेल्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला त्यांनी हजेरी लावून भाविकांशी संवाद साधला. तसेच पिंपळगाव सराई येथील दीपक तळमळे आणि केसापूर येथील श्रीकृष्ण चव्हाण यांच्या ‘नानमुख’ समारंभाला उपस्थित राहून त्यांनी ग्रामीण भागातील तरुणांशी नाळ जोडण्याचा प्रयत्न केला आहे.
या दौऱ्यात त्यांच्यासोबत किसान सेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गायकवाड यांच्यासह स्थानिक कार्यकर्त्यांची मोठी फळी पाहायला मिळाली. चिखली विधानसभा मतदारसंघातील हा वाढता वावर आगामी काळात कोणत्या राजकीय वळणावर जातो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, चिखलीचा गड राखण्यासाठी श्वेताताई महाले या आव्हानाला कशा प्रकारे उत्तर देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
स्थानिक विरुद्ध बाहेरचा मुद्दा कळीचा?
चिखली मतदारसंघाचा इतिहास पाहता, येथील मतदार ‘बाहेरचा’ नेता स्वीकारण्याबाबत नेहमीच सावध पवित्रा घेतात. मृत्युंजय गायकवाड हे शेजारच्या बुलढाणा मतदारसंघातील असले, तरी चिखलीत त्यांनी ज्या पद्धतीने बांधणी सुरू केली आहे, ती पाहता येथील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विद्यमान भाजप आमदार श्वेताताई महाले यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेच्या (शिंदे गट) या युवा नेत्याने सुरू केलेल्या शिरकावामुळे महायुतीमधील अंतर्गत संघर्षाची चर्चाही आता रंगू लागली आहे.