– प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. तुषार गोंधणे यांचा इशारा; होळीच्या रंगात आरोग्याचा विसर नको!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – रंगांचा सण म्हणून ओळखली जाणारी रंगपंचमी अर्थात धूळवड आज साजरी होत आहे. मात्र, बाजारात मिळणारे स्वस्त आणि आकर्षक रासायनिक रंग तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. “उत्सवाचा आनंद घेताना रासायनिक रंगांचा वापर टाळा, अन्यथा हे रंग तुमचे आयुष्य बेरंग करू शकतात,” असा इशारा सुप्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. तुषार गोंधणे यांनी दिला आहे.
बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या अनेक रंगांमध्ये शिसे (Lead), क्रोमियम आणि पारा यांसारखी अत्यंत विषारी रसायने मिसळलेली असतात. हे रंग केवळ त्वचेसाठीच नव्हे, तर केस आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीही गंभीर समस्या निर्माण करू शकतात, असे डॉ. गोंधणे यांनी स्पष्ट केले.
गंभीर आजारांची टांगती तलवार : रासायनिक रंगांच्या वापरामुळे त्वचेवर लालसरपणा येणे, तीव्र खाज सुटणे, पुरळ उठणे किंवा अॅलर्जी होणे अशा समस्या उद्भवतात. काही प्रकरणांमध्ये त्वचेवर कायमस्वरूपी डाग पडू शकतात किंवा संसर्ग होऊ शकतो. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता असते, असेही त्यांनी नमूद केले.
काय काळजी घ्याल? होळीचा आनंद सुरक्षितपणे साजरा करण्यासाठी डॉ. गोंधणे यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत:
-
नैसर्गिक रंगांना प्राधान्य: शक्यतो घरगुती, नैसर्गिक किंवा हर्बल रंगांचाच वापर करावा.
-
सुरक्षा कवच: रंग खेळण्यापूर्वी संपूर्ण शरीराला आणि केसांना खोबरेल तेल किंवा मॉइश्चरायझर लावावे, जेणेकरून रंगाचा थेट त्वचेशी संपर्क येणार नाही.
-
डोळ्यांची निगा: डोळे, नाक आणि तोंडात रंग जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
-
स्वच्छता: रंग खेळून झाल्यानंतर त्वचा घासून साफ न करता सौम्य साबणाचा वापर करून ती स्वच्छ धुवावी.
“होळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. मात्र, रासायनिक रंगांच्या वापरामुळे हा आनंद आरोग्यासाठी महागात पडू शकतो. त्यामुळे नागरिकांनी सजग राहून सुरक्षित पद्धतीने सण साजरा करावा,” असे आवाहन डॉ. तुषार गोंधणे यांनी केले आहे. जर रंगांमुळे त्वचेला कोणताही त्रास जाणवला, तर घरगुती उपाय करण्याऐवजी तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही त्यांनी सुचवले आहे.