-इंद्रायणी नदी काठावर इंद्रायणी आरती उत्साहात
आळंदी (अर्जुन मेदनकर): येथील पुत्रदा भागवत एकादशी निमित्त माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात प्रथा-परंपरांचे पालन करीत हरिनाम गजरात भागवत एकादशी साजरी करण्यात आली.
श्रींच्या संजीवन समाधी मंदिरातील गाभाऱ्यात लक्षवेधी पुष्पसजावट करण्यात आली होती. परंपरेनुसार श्रींना फराळाचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. देवस्थानतर्फे भाविकांना खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले. माऊलींच्या दर्शनासाठी आळंदी परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. इंद्रायणी नदी घाटावर भाविकांनी गर्दी करून आचमन केले. स्थानमहात्म्य जपत भाविकांनी इंद्रायणी नदीचे दर्शन व पूजन करून दीपदान केले. हरिनाम गजरात मंदिर व नगरप्रदक्षिणा करण्यात आली. दिवसभर नदी घाटावर भाविकांची वर्दळ असून परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.
इंद्रायणी आरती सेवा समितीच्या वतीने नित्य-नैमित्तिक एकादशी निमित्त इंद्रायणी नदी घाटावर आरती उत्साहात करण्यात आली. यावेळी संयोजक अनिता झुजम, अर्जुन मेदनकर, दिलीप महाराज ठाकरे, महिला बचत गट महासंघ अध्यक्षा सुवर्णा काळे, छाया देवरे, रेणुका शेजुळ, मयुरी मनाडे, शोभाताई धोंडसे, शैलाताई तापकीर, कौसल्या देवरे, पुष्पाताई लेंडघर, नीलमताई कुरधोंडकर, शारदा सोळुंके, शोभा कुलकर्णी, सावित्रीबाई घुंडरे, विमल मुसळे, सुरेखा काळभोर, जयश्री भागवत, विद्या आढाव, काशीबाई आडीकणे, सुनिता हिळे, अलका पतंगे, उषा पाटील, सृष्टी हिल्ली, राधिका आडीकणे, वर्षा खिल्लारी, मीरा कांबळे, अनिता शिंदे, सुमन व्यवहारे, आशा शिंदे, शिराबाई कदम, सुरेखा कुऱ्हाडे, द्वारका घोंगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
इंद्रायणी आरती सेवा समितीच्या वतीने नागरिक व भाविकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अनिता झुजम व आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी संयोजन केले. पसायदानाने या उपक्रमाची सांगता झाली.