– ठेकेदाराला तात्काळ नोटीस देऊन ब्लॅकलिस्ट करा; स्वच्छ–सुंदर–हरित आळंदीसाठी प्रशासन जागे होणार की नाही?
आळंदी (अर्जुन मेदनकर) – तीर्थक्षेत्र आळंदीचे पावित्र्य राखणे हे केवळ घोषणा न राहता कृतीत उतरावे, अशी जोरदार मागणी होत असतानाही प्रशासनाकडून ठोस हालचाल दिसत नाही. गावभर धुळीचे साम्राज्य पसरले असून नागरिक आणि भाविकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू आहे. आळंदी नगरपरिषदेने तात्काळ उपाययोजना करून धूळ, कचरा आणि सांडपाण्याच्या समस्यांवर नियंत्रण आणावे, अशी संतप्त मागणी नागरिकांतून होत आहे. ‘नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान’चे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी ठेकेदाराला तात्काळ नोटीस काढून ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी करत प्रशासनाला खडेबोल सुनावले. स्वच्छ आळंदी, सुंदर आळंदी आणि हरित आळंदी या संकल्पना केवळ फलकांपुरत्या मर्यादित न राहता प्रत्यक्षात उतरवण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इंद्रायणी नदीलगत महात्मा गांधी रक्षा विसर्जन स्थळ आणि श्री भक्त पुंडलिक मंदिर परिसरातून थेट सांडपाणी नदीत सोडले जात आहे. भक्त पुंडलिक मंदिरासमोरून वाहणारे ड्रेनेजचे सांडपाणी ही श्रद्धेवरचा थेट आघात ठरत आहे. या गंभीर प्रश्नावर उपाययोजना करण्याची मागणी मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्याकडे करण्यात आली असून त्यांना याबाबत कळविण्यात आले आहे.
इतकेच नव्हे तर इंद्रायणी नदी घाटावर कचरा जाळला जात असून त्यामुळे वायू प्रदूषणात भर पडत आहे. पवित्र नदीच्या काठावर अशी बेजबाबदार कृती सुरू असताना प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप होत आहे. तीर्थक्षेत्र आळंदी आणि इंद्रायणीच्या पावित्र्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे भाविक व नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. आता तरी प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.