– पावसामुळे शोध कार्यात अडथळे; तीनखडी गावावर शोककळा
– जायकवाडीतून गोदावरीपात्रात विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
नगर/शेवगाव (बाळासाहेब खेडकर) – पाथर्डी तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी मोहटादेवी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने धायतडकवाडी गावाच्या हद्दीत असलेल्या बोरीच्या ओढ्यात तालुक्यातील तीनखडी येथील पांडुरंग निवृत्ती आंधळे (वय ७२) हे आपल्या दुचाकीवरून गावाकडे जात असतांना पाण्याचा अंदाज न आल्याने ओढ्यात जाताना दुचाकीसह वाहून गेल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. दरम्यान, प्रशासनाकडून सबंधित इसमाचा शोध सुरू असून, चालू असलेल्या पावसामुळे व अंधारामुळे शोधकार्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत.
मराठवाड्यासह जिल्ह्यातील शेवगाव व नेवासा तालुक्याला वरदान ठरणार्या जीवन जायकवाडी जलाशयात गुरुवारी रात्री एकूण पाणीसाठा १०२.१८४६ टीएमसी ९९.४८ टक्के तसेच उपयुक्त पाणीसाठा ७६.११८४ टीएमसी ९९.२८ टक्केपर्यंत जाऊन पोहोचल्याने धरण प्रशासनाने जायकवाडीतून गोदावरी नदी पात्रात तिसर्यांदा पाण्याचा विसर्ग सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास जलाशयातून गेट क्रमांक १० ते २७ असे एकूण १८ गेटमधून चार फुटापर्यंत उघडून ७५ हजार ४५६ क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू केल्याची माहिती धरण प्रशासनाकडून सांगण्यात आली. सध्या जायकवाडी सागर जलाशयात नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पातून १२६२० क्युसेसने पाण्याची आवक सुरू आहे. नाशिक, त्रिंबकेश्वर, इगतपुरी, घोटी या परिसरात सध्या जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे जलाशयात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. गेल्या २४ तासात जलाशयात ४.८२८९ क्युसेस नवीन पाण्याची आवक झाली असून, यंदाच्या पावसाळ्यात आत्तापर्यंत ८०.२११० क्युसेस नवीन पाणी दाखल झाले असून, शुक्रवारी सकाळी जलाशयाचा एकूण पाणीसाठा ९९.४७ टक्केपर्यंत जाऊन पोहोचल्याने धरण प्रशासनाने जलाशयातून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्याप्रमाणे ७५ हजार ४५६ क्युसेसने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. आता जलाशयात नवीन पाण्याची आवक बघून विसर्ग कमी- जास्त करण्यात येईल, असेही धरण प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.
गोदावरी नदीकाठच्या जनतेने सावध राहण्याचा इशारा जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिला असून, शेवगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असले तरी नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, घोटीयासह जलाशयाच्या लाभक्षेत्रात जोरदार पाऊस असल्यामुळे जायकवाडी जलाशय आत्तापर्यंत तब्बल तीनवेळा १०० टक्केच्या आसपास भरले गेले आहे. त्यामुळे यंदा पावसाळ्यात तिसर्यांदा धरण प्रशासनाने जलाशयातून गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. सायंकाळी पाण्याची आवक कमी झाल्याने विसर्ग कमी करण्यात आला असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे.