– महसूल दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट कामकाज करणार्या महसूल अधिकार्यांचा होणार गौरव
– सर्वोत्कृष्ट तहसीलदार म्हणून जिल्हाधिकार्यांकडून संतोष काकडे यांची विभागीय आयुक्तांकडे शिफारस
चिखली (महेंद्र हिवाळे) – लोकाभिमुख प्रशासन, प्रशासकीय कामकाजात माहिती व तंत्रज्ञानाचा वापर, तसेच सर्व सामान्य जनतेला महसूल सेवांचा विनाअडथळा लाभ उपलब्ध करून देणारे, तसेच जीवंत सातबारा मोहिमेचे जनक ठरलेले चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे यांची सर्वोत्कृष्ट तहसीलदार म्हणून बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी अमरावती विभागीय आयुक्तांकडे शिफारस केली आहे. महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट महसूल कर्मचार्यांचा विभागीय आयुक्तांच्यावतीने सन्मान केला जाणार आहे. यंदा हा सन्मान तहसीलदार संतोष काकडे यांना प्राप्त होणार आहे.
‘महसूल दिन’ म्हणजे महाराष्ट्रात दरवर्षी १ ऑगस्टरोजी साजरा होणारा दिवस आहे. हा दिवस ‘महसूल विभाग’ आणि ‘महसूल कर्मचारी’ यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी, महसूल विभागात उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचार्यांचा सत्कार करण्यात येतो. या सन्मानासाठी विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडून पात्र अधिकार्यांचे नामनिर्देशन मागितले होते. त्यानुसार, उपजिल्हाधिकारी महसूल यांनी गुणवत्तेनुसार पात्र ठरलेल्या अधिकार्यांचे नामनिर्देशन विभागीय आयुक्तांकडे केले आहे. त्यामध्ये, उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून डॉ. रामेश्वर पुरी, उपविभागीय अधिकारी कार्यालय खामगाव यांचे नामनिर्देशन करण्यात आले असून, उत्कृष्ट तहसीलदार म्हणून चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे यांचे नामनिर्देशन करण्यात आलेले आहे. प्रशासनात माहिती व तंत्रज्ञानाचा वापर, लोकाभिमुख प्रशासन, प्रशासकीय कामकाजातील गतिमानता, आणि जीवंत सातबारा मोहिम यासह अनेक त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे तहसीलदार काकडे यांना सन्मान प्राप्त होणार आहे. उत्कृष्ट नायब तहसीलदार म्हणून नादुरा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार एस एस व्हटटे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली असून, उत्कृष्ट सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील कु. पल्लवी राठोड यांची शिफारस करण्यात आली आहे. उत्कृष्ट मंडळ अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथील मंडळ अधिकारी संवर्गातील संजय दिनकर जोशी यांची तर, उत्कृष्ट महसूल सहाय्यक म्हणून देऊळगावराजा तहसील कार्यालयातील जे एन वाघ यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. मेहकर तहसील कार्यालयातील अमोल राठोड यांची उत्कृष्ट तलाठी म्हणून शिफारस करण्यात आली असून, जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथील रामेश्वर शिंदे यांची उत्कृष्ट शिपाई म्हणून शिफारस करण्यात आली आहे. तर कोतवाल संवर्गातील आर एन अडकणे, तहसील कार्यालय जळगाव जामोद यांची उत्कृष्ट कोतवाल म्हणून शिफारस करण्यात आलेली आहे.