शहादा जिल्हा नंदूरबार (ब्रेकिंग महाराष्ट्र) जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील निसर्गरम्य सातपुड्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या पर्वतरांगेदरम्यान दरा प्रकल्पाजवळ असलेले उनपदेव हे ठिकाण गरम पाण्याच्या झरा म्हणून प्रसिद्ध आहे. सध्या पावसाळी वातावरण असल्याने येथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. परंतु सेल्फी साठी जीव धोक्यात टाकून सेल्फी घेत असल्याचे निदर्शनास येत असल्याने प्रशासनाने दखल घेऊन निदान सुट्टीच्या दिवशी तरी पोलीस बंदोबस्त ठेवल्यास भविष्यात घडणाऱ्या वाईट दुर्घटनेला आळा बसू शकेल.
शहादा- धडगाव रस्त्यावर दरा या ठिकाणापासून साधारणतः दोन किलोमीटर अंतरावर उनपदेव हे ठिकाण आहे. निसर्गरम्य असल्याने येथे पर्यटकांची सतत वर्दळ असते. विशेषता: पावसाळ्यात येथे मोठी गर्दी असते.येथे प्राचीन शिवाचे मंदिर असल्याने श्रावण महिन्यात भाविकांची वर्दळ वाढते. लगतच खाली वाहणारी वाकी नदी.साधारणता १९६५ पासून या ठिकाणी मोठे कुंड बांधण्यात आल्याचे समजते . गरम पाण्याच्या झरा जेथून पडतो तेथे गोमूख बांधण्यात आले आहे. परंतु २००६ मध्ये आलेल्या महापुरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या गोमुखातून पडणाऱ्या गरम पाण्यात आंघोळ करण्यासाठी भाविक हजेरी लावतात. या पाण्यात आंघोळ केल्याने त्वचारोग बरा होतो असा काहींचा समज आहे. येथूनच पुढे काही अंतरावर दरा मध्यम प्रकल्प असून या प्रकल्पामुळे येथील सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. हा प्रकल्प सद्या ओसंडून वाहत आहेत त्यामुळे पर्यटनाचा आनंद लुटणाऱ्यांसाठी ही एक पर्वणीच असते त्यातच या आधुनिक काळात नवनवीन मोबाईल हाताळणाऱ्यांची सेल्फी काढन्यासाठी जणू याठिकाणी स्पर्धाच लागलेली असते.मात्र ही हौस अनेकांच्या जीवावर देखील बितल्याच्या अनेक घटना घडत आहेत
बंदोबस्ताची मागणी….
सध्या रिमझिम पाऊस सुरू असल्याने निसर्गाच्या आनंद लुटण्यासाठी तसेच धबधबेही ओसंडून वाहत असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे त्यात सेल्फी फोटो घेणारी ही तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहे राज्यात व परिसरात सेल्फीच्या नादात जीव गमावल्याच्या घटना घडल्या आहेत. परिसरात अशा घटना होऊ नये यासाठी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन जीव धोक्यात टाकून सेल्फी घेणाऱ्यांना समज देणे गरजेचे आहे अन्यथा भविष्यात वाईट दुर्घटना घडू शकते.