बुलढाणा (खास प्रतिनिधी) – बुलडाणा जिल्ह्यातील डोंगर खंडाळा येथील दारूबंदीसाठी महिला व पुरुषांनी १४ फेब्रुवारीला मोर्चा काढला. दरम्यान, काही गावात दारूचे दुकान बंद होत आहे. परंतु ते दुकान परत दुसर्या गावात सुरू होते. परंतु परवाना रद्द होत नाही. महिला सक्षमीकरण खरंच करायचं असेल तर शासनाने दारूबंदीच्या कायद्यात बदल करण्याचा निर्णय घ्यावा, किचकट कायदा ठेवू नये, अशी मागणी दारूबंदी प्रणेत्या प्रेमलता सोनवणे यांनी जिल्हा प्रशासनाला केली.
डोंगर खंडाळ्यातच नाही तर जिल्ह्यात अवैध दारूचा महापूर वाहत आहे. दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊन काही महिलांना वैधव्य प्राप्त झाले आहे. वारंवार मागणी करुनही दारूबंदी होत नसल्याने आज संतप्त झालेल्या गावातील पुरुष महिलांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. जिल्ह्यातील काही ग्रामीण भागात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारू खुलेआम विकली जात आहे. सोबतच सट्टा, मटका, जुगारासारख्या अवैध धंद्यांना ऊत आला आहे. अनेक कुटुंबातील कर्ता पुरुष व्यसनाधीन होत असल्याने महिलांना व लहान मुलांना त्रास होत आहे. या अवैध धंद्यांच्या विरोधात कारवाई व्हावी, अशी मागणी करीत संतप्त महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन, शासनाने दारूबंदीच्या कायद्यात बदल करण्याचा निर्णय घ्यावा,किचकट कायदा ठेवू नये, अशी मागणी दारूबंदीच्या प्रणेत्या प्रेमलता सोनवणे यांनी केली आहे.