BULDHANAVidharbha

कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा येथे शेतकरी-शास्त्रज्ञ मंचची पहली सभा उत्साहात

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा अंतर्गत असलेल्या शेतकरी-शास्त्रज्ञ मंचची पहिली सभा जगदीशचंद्र गुळवे, रा. सागवान, ता. जि. बुलढाणा यांच्या शेतावर आज (दि.१ डिसेंबररोजी) उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतशील रेशीम उत्पादक शेतकरी जगदीशचंद्र गुळवे हे होते. या कार्यक्रमास डॉ. अनिल तारू, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा डॉ. चंद्रकांत जायभाये, वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी संशोधन केंद्र, बुलढाणा आणि जिल्हा रेशीम अधिकारी श्री. फडके साहेब हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य आणि जिल्ह्यातील प्रगतशील रेशीम उत्पादक शेतकरी आणि कृषि विज्ञान केंद्राचे सर्व शास्त्रज्ञ उपस्थित होते.

यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. अनिल तारू यांनी आपल्या प्रास्ताविकेतून शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाच्या स्थापनेमागची भूमिका सर्वांसमोर मांडली आणि जिल्ह्यातील विविध शेतीतील आणि सलग्न व्यवसायातील उपक्रम घेऊन शेती करणारे प्रगतशीळ शेतकरी यांच्या शेतावर अशा सभेचे आयोजन पुढे होणार असल्याबाबत सर्वांना सांगितले. या सभेच्या माध्यमातून शेती व शेती संलग्न व्यवसाय करणारे शेतकरी पुढे येऊन इतर शेतकर्‍यांना या मंचाच्या माध्यमातून मार्गदर्शन करतील आणि त्याचा फायदा इतर शेतकर्‍यांना होईल, तसेच नवीन तंत्रज्ञान वापराकरिता बुलढाणा येथील कृषी विज्ञान केंद्र, कृषी संशोधन केंद्र आणि कृषी तंत्र विद्यालय या कार्यालयाच्या माध्यमातून सभेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले जाईल असे त्यांनी सांगितले. जिल्हा रेशीम कार्यालयाचे प्रमुख श्री. फडके साहेब यांनी यावेळी उपस्थित शेतकर्‍यांना रेशीम उत्पादनासाठी (चॉकी) बाल्यावस्था रेशीम कीटक संगोपन, तुती लागवड, लागवडीच्या विविध पद्धती, संगोपनादरम्यान घ्यावयाची काळजी व निगा, कीटक संगोपन व व्यवस्थापन, कोष निर्मिती तसेच सध्या शासनामार्फत राबविण्यात येणार्‍या महा-रेशीम अभियान अंतर्गत शासनाच्या अनुदानाविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

ज्यांच्या शेतीवर हा कार्यक्रम आयोजित केला असे जगदीशचंद्र गुळवे हे मागील २१ वर्षापासून रेशीम उत्पादन हा व्यवसाय करत असून ते मागील पंधरा वर्षांपासून ते चॉकी उत्पादन व विक्रीचे काम बुलढाणा जिल्ह्यात करताहेत. कार्यक्रमादरम्यान त्यांनी आपल्या रेशीम शेतीची सुरुवात कशा पद्धतीने झाली आणि आजपर्यंतची वाटचाल या विषयी सांगताना विविध टप्प्यामध्ये आलेल्या समस्या त्याच्यावर केलेल्या उपाययोजना आणि सध्य परिस्थितीमध्ये या रेशीम कीटक संगोपनाच्या माध्यमातून त्यांना मिळत असलेल्या उत्पन्नाबाबत शेतकर्‍यांना माहिती दिली. कमी क्षेत्रफळामध्ये चांगले उत्पादन कशा पद्धतीने घेता येईल, याबाबत शेतकर्‍यांना सांगताना कमीत कमी वेळ आणि कमी क्षेत्रामध्ये इतर पिकांच्या किंवा शेती सलग्न पशुसंवर्धन, कुक्कुटपालन किंवा इतर कोणत्याही व्यवसायाच्या तुलनेत कमी वेळेमध्ये जास्त उत्पादन आणि उत्पन्न रेशीम उत्पादनापासून कसे घेता येऊ शकते याबाबत सर्वांना मार्गदर्शन केले. मागील पंधरा वर्षापासून ते जिल्ह्यातले एकमेव रजिस्टर चॉकी उत्पादक असून, शेतकर्‍यांना बाल्य अवस्थेतील रेशीम कीटक पुरवण्याचे काम ते सातत्याने करत आहेत, आणि अनेक शेतकर्‍यांनी रेशीम शेतीच्या माध्यमातून प्रगती साधली आहे, याबाबत त्यांनी माहिती दिली. रेशीम शेती करत असताना आवश्यक त्या बाबीवर प्रकाश टाकत त्यांनी सांगितले की, रेशीम शेतीमध्ये सातत्यपूर्ण काम आणि व्यवस्थापनाची आवश्यकता भासते. यामध्ये थोडीही ढील चालत नाही कारण तुतीच्या पानावर जगणार्‍या आळ्या खाद्य नाही भेटल्यास मरण पावतात त्यामुळे त्यांची निगा घेणे खूप आवश्यक आहे आणि हे ज्यांना शक्य असेल त्यांनीच या व्यवसायाकडे वळावे कारण उत्पन्न जरी चांगले भेटत असले तरी कष्ट करण्याची जिद्द आणि सातत्यपूर्ण काम करण्याची तयारी असल्यासच या व्यवसायामध्ये यश मिळवता येऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाच्या सर्व नोंदणीकृत २२ सदस्याच्या उपस्थितीमध्ये आणि रेशीम कीटक संगोपन करणारे रेशीम उत्पादक शेतकर्‍यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमादरम्यान सविस्तर अशी सांगोपांग चर्चा घडून आली, आणि चर्चेच्या माध्यमातून तुती लागवडी मधील विविध प्रयोग, रेशीम कीटक संगोपणा मधील विविध बारकावे आणि विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे प्रगतिशील शेतकरी यांचे अनुभव त्यांनी यावेळी व्यक्त केले. विचारांची देवाण-घेवाण या ठिकाणी होऊन शेतकर्‍यांच्या या शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाच्या उपक्रमाची सुरुवात आज दिनांक ०१ डिसेंबर २०२२ रोजी खर्‍या अर्थाने झाली. कार्यक्रमादरम्यान सर्व उपस्थित शेतकर्‍यांनी जगदीशचंद्र गुळवे यांच्या शेतीवरील तुती लागवड तसेच रेशीम कीटक संगोपन गृह आणि सध्या बाल्या अवस्थेतील रेशीम कीटक (चॉकी उत्पादन केंद्र) याची माहिती घेतली आणि रेशीम उत्पादनाकरिता लागणार्‍या विविध अवजारे उपकरणे आणि इतर घटकाची बारकाईने माहिती समजून घेतली. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात मंचाचे सदस्य शेतकरी, शास्त्रज्ञ आणि रेशीम उत्पादक शेतकरी यांच्यामधील झालेल्या चर्चेच्या माध्यमातून रेशीम उत्पादन करू इच्छिणार्‍या शेतकर्‍यांसाठी जिल्हा रेशीम कार्यालयात नोंदणी करिता प्रयत्न करण्यात येतील आणि हा व्यवसाय जिल्ह्यात वाढण्यासाठी मंचाच्या सदस्य शेतकर्‍याच्या वतीने प्रयत्न केले जातील अशी ग्वाही दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!