संतविचार हे कालातीत असतात. प्रत्येक काळातील अन्वयार्थ त्यांच्या साहित्यविचारात शोधता येतात. संत हे मनुष्याला सन्मार्गाचाच संदेश देत असतात. ते सदासर्वकाळ माणसाच्या कल्याणाचाच विचार करीत असतात. प्रत्येकाच्या जीवनाचे सार्थक व्हावे, अशी त्यांची मनोमन इच्छा असते. प्रत्येकाच्या जीवाचा उद्धार व्हावा अशीच संतांची तळमळ असते. संत विचारात प्रत्येक काळातील समस्यांवर मात करण्याची शक्ती असते. अलीकडच्या काळात माणसाच्या निष्ठा ह्या पातळ होत चाललेल्या आहेत. आज प्रत्येक क्षेत्रात निष्ठावंतांची खरी गरज आहे. निष्ठा ह्या मनुष्याला ऊर्जा देत असतात. निष्ठा ह्या मानवाला जगण्याचं बळ, जगण्याची हिंमत देत असतात. संत हे काळाची गरज ओळखून समाजाला उपदेश करीत असतात.
निष्काम कर्मयोगी संत शुकदास महाराज प्रत्येकाने निष्ठावंत व्हावे अशी अपेक्षा करतात. आपल्या ‘अनुभूति’ ग्रंथातील ५० क्रमांकाच्या अभंगात शुकदास महाराज म्हणतात,
नको ध्येय सोडू, प्राण गेला तरी। योग्य तेची करी, चिकाटीने।।
जरी गेले धन, झाला अपमान। मित्रही सोडून, गेले जरी।।
जग हे उठले, कराया विरोध । तरी तू सावध, ढळू नको।।
शुकदास म्हणे, व्हावे निष्ठावंत। धरूनि हिंमत, पुढे यावे।।
प्राण गेला तरी चालेल; परंतु हे मानवा तू तुझे निश्चित केलेले ध्येय सोडू नको. ‘प्राण जाय पर वचन न जाय’ या उक्तीप्रमाणे तू तुझे वर्तन कर. तू तुझ्या जीवनामध्ये जे जे योग्य आहे ते ते अतिशय चिकाटीने कर. जे खरोखर योग्य आहे, जे सत्य आहे ते करताना मग तुझे धन जरी गेले, तुझी संपत्ती जरी नष्ट झाली. सत्याचा मार्ग स्वीकारतांना तुझे जिवलग मित्र जरी तुला सोडून गेले, तरी तू मात्र लक्ष प्राप्तीसाठी अटळ रहा. योग्य मार्गाने जीवन जगत असताना जग तुला विरोध करेल; परंतु अतिशय सावध राहून आपल्या निश्चित केलेल्या ध्येयापासून तिळमात्रही ढळू नकोस. शुकदास महाराज म्हणतात, निश्चित केलेल्या ध्येयावर अतिशय विश्वासाने, निष्ठेने, हिमतीने आपण पुढे यावे. म्हणजेच ध्येय, अढळ निश्चय, चिकाटी, सावधानता, निष्ठा, हिंमत हा आधुनिक काळातील यशस्वी जीवन जगण्यासाठीचा मूलमंत्रच संत शुकदास महाराज देतात. विद्यार्थ्यांना शालेय जीवनात यश संपादन करण्यासाठी महाराजांनी सांगितलेल्या वरील सूत्रांचा चांगला उपयोग होतो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि जीवनात यश संपादन करण्यासाठी महाराजश्रींचा हा उपदेश उपकारक ठरतो. हाच आशय कर्मयोगी संत शुकदास महाराजांच्या ‘अनुभूति’ ग्रंथातील ४५ क्रमांकाच्या आणखी एका अभंगात आढळून येतो. संत शुकदास महाराज म्हणतात,
विचार करूनि, ठरवी उद्दिष्ट । ज्यामुळे शेवट, गोड होय।।
नको रे नको ते, निर्ध्येय वर्तन । निष्फळ जीवन, जात असे।।
ठरविल्याविन, करिता गमन। तसे ध्येयहीन, माणसाचे ।।
शुकदास म्हणे, तैशा रिती असे। जोपर्यंत नसे, ध्येय पुढे।।
केवळ उद्दिष्टच ठरवा असे नाही तर उद्दिष्टे अतिशय विचारपूर्वकच ठरविल्या गेली पाहिजेत. जेणेकरून त्याची परिनीती चांगली होईल. तुम्ही तुमच्या जीवनाचे ध्येय ठरवले नाही; तर तुमचे जीवन निष्फळ जाईल. तुमची जीवनरूपी नौका भरकटलेल्या शिवाय राहणार नाही. तुम्ही तुमचा मार्ग निश्चित न करता जर प्रवास करीत असाल तर ध्येयहीन माणसाच्या अवस्थेसारखी तुमची अवस्था होईल. शुकदास महाराज म्हणतात, जोपर्यंत तुमच्या पुढे निश्चित असे ध्येय नसेल तोपर्यंत तुमच्या हाताला काहीही येणार नाही. ‘याजसाठी केला होता अट्टहास। शेवटचा दिस गोड व्हावा’ याची प्रचिती यावी असे वाटत असेल तर आपल्या जीवनामध्ये निश्चित प्रकारचे ध्येय असणे आवश्यक आहे. मनुष्याचे जीवन हे निर्ध्येय असूच नये असे संत शुकदास महाराज ठणकावून सांगतात. जीवनामध्ये आपण काहीतरी कर्तृत्व करून दाखवावे. केवळ निष्फळ जीवन घालवू नये. त्यासाठी जीवनामध्ये ध्येय हवे. हा आधुनिक काळातील यशाचा मंत्र शुकदास महाराज देतात.
वरील दोन्ही अभंग हे वर्तमान काळातील मानवी जीवनाच्या यशाचे गमक निर्देशित करतात. ‘नको रे नको ते निर्ध्येय वर्तन’ या चरणातून महाराजांच्या स्वजीवनातील स्वकर्तुत्वाची तळमळ दिसून येते. त्यांच्या ‘शिवभावेतून जीव सेवेच्या ध्यासाचे दर्शन घडल्याशिवाय राहत नाही. महाराजांच्या जीवनातील शिस्त, नीटनेटकेपणा, स्वच्छता, नियोजन, चिकाटी, शिक्षणाचा आग्रह, आरोग्यविषयक विचार व कार्य,जीवनातील आदर्श, माणसातील ईश्वराचा ध्यास, युवकांकडे पाहण्याचा दृष्टिकोण, अध्यात्म आणि विज्ञानाचा समन्वय, कृषी, पर्यावरण, भूतदया, समतावादी व मानवतावादी विचार, सर्वधर्मसमभाव,संस्कृती जतन व संवर्धन, इत्यादींचा एक नवा आदर्श समाजासमोर निर्माण केला आहे.
(लेखक हे संत साहित्याचे अभ्यासक व व्याख्याते असून, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आहेत. मो.नं ९९२३१६४३९३)