-गुजरातमधील वडोदरा येथे २१ ते २५ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या स्पर्धेत विदर्भाच्या संघाचे करणार प्रतिनिधित्व
चिखली (राजेंद्र घुबे) : देऊळगाव घुबे येथील जानकीदेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची खो-खो खेळाडू कु. आरती बद्रीनाथ घुबे हिची १९ वर्षांखालील मुलींच्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. गुजरातमधील वडोदरा येथील परुल युनिव्हर्सिटी येथे २१ ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत कु. आरती विदर्भाच्या संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
कु. आरती ही जानकीदेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत आहे. गोंदिया येथे पार पडलेल्या विदर्भ राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिला विद्यालयाचे शिक्षक संजय सावंत यांचे क्रीडा मार्गदर्शन लाभले. आरतीच्या या यशाबद्दल भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शेनफडरावजी घुबे, सचिव उद्धवराव घुबे आणि प्राचार्य बबनराव लांडगे यांनी तिचे अभिनंदन केले असून, राष्ट्रीय स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही तिचे कौतुक करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.