ज्या मातीने लावणीची पखरण शिकवली, त्या कांबी गावावर दुःखाचा डोंगर; वाचनालयाच्या रूपाने जपली होती सामाजिक नाळ!
शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : मराठी लोककला, लावणी, लोकनाट्य आणि चित्रपटसृष्टीवर आपल्या अफाट अभिनयाने व नृत्याने अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी पुण्यात निधन झाले. दीर्घ आजाराशी झुंज दिल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण मराठी सांस्कृतिक विश्वासह शेवगाव तालुक्यातील त्यांच्या मूळ कांबी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माळेगाव येथे जन्म झाला असला, तरी मधू कांबीकर यांचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण शेवगाव तालुक्यातील कांबी गावातच झाले. याच गावाच्या मातीत त्यांच्या लोककलेची आणि कलाप्रतिभेची खऱ्या अर्थाने जडणघडण झाली. औपचारिक शिक्षण सातवीपर्यंत झाले असले, तरी प्रत्यक्ष रंगमंच हेच त्यांच्या अभिनयाचे खरे विद्यापीठ ठरले. ग्रामीण भागातील खडतर परिस्थितीतून पुढे येत त्यांनी नाट्य आणि चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले.
‘सखी माझी लावणी’ हा त्यांचा स्वतःचा लावणी कार्यक्रम विशेष गाजला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी लावणीच्या सादरीकरणाला एक नवी आणि स्वतंत्र ओळख मिळवून दिली. महाराष्ट्राबाहेर तसेच अमेरिका, दुबई, अबुधाबी आणि मॉरिशस यांसारख्या देशांत सादरीकरण करून त्यांनी मराठी लोककलेचा पताका परदेशातही फडकावला.
एकेकाळी आपल्या लावणी आणि अभिनयाने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या मधुताईंना नंतरच्या काळात गंभीर आजाराचा सामना करावा लागला. लावणी सादर करतानाच त्यांची प्रकृती बिघडली होती आणि त्यांना पक्षाघाताचा (पॅरालिसिस) झटका आला होता. गेल्या काही वर्षांपासून त्या अंथरुणाला खिळलेल्या होत्या. अखेर आजाराशी दिलेली त्यांची ही दीर्घ संघर्षयात्रा संपली.
कांबी गावात उभारले सार्वजनिक वाचनालय
कलेच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही मधू कांबीकर यांनी आपल्या कांबी गावाशी असलेले नाते कायम जपले. गावाविषयी असलेल्या अपार प्रेमापोटी त्यांनी कांबी येथे सार्वजनिक वाचनालयाची उभारणी केली होती. एक महान कलाकार असण्यासोबतच त्यांनी सामाजिक उत्तरदायित्वही तितक्याच निष्ठेने पार पाडले.
तमाशाच्या फडापासून ते चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीपर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. त्यांच्या निधनाने मराठी लोककलेतील एक सुवर्णपर्व संपले असून कांबी गावाने आपली लाडकी कन्या गमावली आहे. त्यांचा हा जीवनप्रवास नव्या पिढीतील कलाकारांसाठी सदैव प्रेरणादायी राहील.
मराठी लोककलेच्या या महान अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली!
ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आणि लावणीसम्राज्ञी मधु कांबीकर यांचे निधन; ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!