-श्री व्यंकटेश महाविद्यालयातील ‘टॉक शो’मध्ये पी. के. इन्स्टिट्यूट ऑफ फोटोग्राफीचे संचालक प्रदीप कुटे यांचा प्रेरणादायी संवाद
देऊळगाव राजा (सुरेश हुसे) : “क्षेत्र कोणतेही असो, यशासाठी मेहनत, सातत्य, संयम आणि कौशल्याची जोड आवश्यक आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी संघर्षाला न घाबरता ध्येयाकडे वाटचाल केली, तर यश निश्चित मिळते,” असा प्रेरणादायी संदेश पी. के. इन्स्टिट्यूट ऑफ फोटोग्राफीचे संचालक तथा श्री व्यंकटेश महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रदीप कुटे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष कै. श्रीमंत राजे राजेंद्रसिंह जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थी विकास समिती व मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘टॉक शो’ अर्थात माजी विद्यार्थी-व्यावसायिकांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रदीप कुटे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपल्या फोटोग्राफी व्यवसायातील संघर्षमय प्रवास आणि यशाची कहाणी उलगडली. कुटे यांनी आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीपासून फोटोग्राफी क्षेत्राची निवड करण्यामागील प्रेरणेपर्यंतचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला. व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात आलेल्या अडचणी, बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना करावे लागलेले प्रयत्न आणि ग्राहकांचा विश्वास मिळविण्यासाठी केलेली मेहनत याबाबत त्यांनी मनमोकळेपणाने अनुभव कथन केले.
बदलत्या तंत्रज्ञानासोबत स्वतःला अपडेट ठेवा
फोटोग्राफी क्षेत्रात सातत्याने बदल होत आहेत. त्यामुळे केवळ कॅमेरा हाताळता येणे पुरेसे नसून नवीन तंत्रज्ञान, डिजिटल माध्यमे, आधुनिक उपकरणे आणि बदलत्या ग्राहकांच्या गरजा यांचा सातत्याने अभ्यास करणे गरजेचे आहे. कौशल्य जितके अद्ययावत, तितक्या संधी अधिक, असे कुटे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. आजच्या स्पर्धेच्या युगात व्यवसायात यशस्वी होण्यासाठी गुणवत्ता आणि ग्राहकांचा विश्वास हीच खरी ताकद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कामातील प्रामाणिकपणा, वेळेचे नियोजन, सातत्य, नवीन प्रयोग करण्याची तयारी आणि ग्राहकांशी जिव्हाळ्याचे संबंध या बाबी व्यावसायिक यशासाठी महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘करिअरची दिशा स्वतः ठरवा’
विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र ओळखून त्यात करिअर करण्याचा निर्णय घ्यावा. सुरुवातीच्या अपयशामुळे किंवा अडचणींमुळे खचून न जाता प्रत्येक अनुभवातून शिकत पुढे जावे. इच्छाशक्ती, मेहनत आणि सातत्य या तीन गोष्टींच्या जोरावर सामान्य परिस्थितीतूनही यशस्वी व्यावसायिक होता येते, असा विश्वास प्रदीप कुटे यांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला. व्यवसायासोबत सामाजिक बांधिलकी जपण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. आपल्या क्षेत्रात यश मिळविताना समाजासाठी योगदान देणे हीदेखील प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. या संवाद कार्यक्रमास श्री बालाजी संस्थानचे वंशपरंपरागत विश्वस्त तथा महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव, सेवानिवृत्त शिक्षक दीपक नागरे, ज्येष्ठ साहित्यिक रमेश नरोडे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संवादक म्हणून विद्यार्थी विकास अधिकारी तथा मराठी विभागप्रमुख प्रा. मधुकर जाधव यांनी भूमिका पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रदीप राठोड यांनी केले. प्रास्ताविक व अतिथी परिचय डॉ. ज्योती ढोकले यांनी करून दिला. प्रा. सोपान चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. किरण मोगरकर यांनी परिश्रम घेतले.