-सम्राट अशोक बुद्ध विहारात सामूहिक बुद्धवंदनेनंतर उपासक-उपासिकांना खिरीचे वाटप
साकेगाव (महेंद्र हिवाळे) : साकेगाव येथील सम्राट अशोक बुद्ध विहार येथे दि. २७ ऑगस्ट रोजी पौर्णिमेनिमित्त सोमनाथ तायडे (पाटील) यांच्या वतीने बौद्ध उपासक-उपासिकांना खीरदान करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक बुद्धवंदना आणि पंचशील ग्रहणाने करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने उपासक-उपासिका तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
बौद्ध धम्मात वर्षावास हा अत्यंत पवित्र काळ मानला जातो. आषाढ पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत तीन महिने भिक्खू एका विहारात राहून धम्मसाधना करतात. भगवान बुद्धांच्या काळापासून पावसाळ्यात भिक्खूंच्या पायाखाली लहान जीव-जंतूंची हिंसा होऊ नये, यासाठी एका ठिकाणी राहण्याची परंपरा सुरू झाली. यालाच वर्षावास म्हटले जाते. वर्षावासाच्या काळात पौर्णिमेला केलेल्या दानाला विशेष महत्त्व असून, श्रद्धेने केलेल्या दानामुळे पुण्यसंचय होतो आणि मनातील लोभ कमी होऊन मन शुद्ध होते, अशी बौद्ध धम्मातील धारणा आहे. वर्षावासात आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि अश्विन अशा चार पौर्णिमा येतात. प्रत्येक पौर्णिमेचा संबंध भगवान बुद्धांच्या जीवनातील विविध घटनांशी जोडला जातो. त्यामुळे या काळात दानधर्माला विशेष महत्त्व दिले जाते. पौर्णिमेनिमित्त भिक्खूंना भोजन, चीवर, औषधी, पुस्तके, दिवाबत्ती, फळे-फुले आदींचे दान करण्याची परंपरा आहे. अश्विन पौर्णिमेला वर्षावासाची सांगता होत असून, या काळात केले जाणारे चीवरदान विशेष महत्त्वाचे मानले जाते. “दानं ददन्तु सद्धाय, सीलं रक्खन्तु सब्बदा” या भावनेतून श्रद्धेने दान केल्याने जीवनातील दुःखातून मुक्तीचा मार्ग सुकर होतो, असा संदेश यावेळी देण्यात आला. वर्षावासातील पौर्णिमेचे दान हे शेतकऱ्याने पेरलेल्या बियाण्याप्रमाणे असून, त्यातून चांगले फळ मिळते, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या खीरदान कार्यक्रमाला कुशीवर्ता निकाळजे, विमल निकाळजे, लक्ष्मी निकाळजे, कौशल्या निकाळजे, संगीता निकाळजे, शोभा पवार, सविता म्हस्के, रमाबाई वानखेडे, जिजाबाई जाधव, अंतःकला निकाळजे, भारत घेवंदे, प्रकाश निकाळजे, रंगनाथ निकाळजे, केशव निकाळजे, विष्णू निकाळजे, आस्रुबा निकाळजे, किशोर निकाळजे, आलम खान, हुसेन खान, सचिन इंगळे, आकाश इंगळे, शुभम तायडे, सचिन लोखंडे, अरविंद इंगळे (पाटील) तसेच समस्त समाजबांधव व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जितू निकाळजे, अशोक निकाळजे, अनिल निकाळजे, समाधान निकाळजे तसेच ग्रंथश्रवणासाठी येणाऱ्या महिलांच्या मंडळाने परिश्रम घेतले.