-रेशनचे धान्य नागरिकांसाठी की जनावरांसाठी? संतप्त नागरिकांचा सवाल; पुरवठा विभागाकडून तक्रारीची दखल
चिखली (प्रतिनिधी) : सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या तांदळाविरोधात संतप्त नागरिकांनी सोमवारी, २४ ऑगस्ट रोजी चिखली तहसील कार्यालय गाठत तहसीलदारांच्या दालनासमोरच रेशनचा तांदूळ ओतून निषेध नोंदवला. रेशन दुकानातून मिळालेला तांदूळ खराब, चुरियुक्त आणि खाण्यायोग्य नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. “या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी बायका-पोरांसोबत खावी; मग आम्हीही खाऊ,” अशा शब्दांत संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.
स्थानिक स्वस्त धान्य दुकानातून शासनामार्फत वितरित करण्यात आलेले धान्य अत्यंत निकृष्ट असल्याची तक्रार संबंधित नागरिकाने केली. हातात तांदळाचा नमुना घेऊन तहसील कार्यालयात पोहोचलेल्या नागरिकाने तो तहसीलदारांच्या कॅबीनसमोर ओतून आपला संताप व्यक्त केला. “जे धान्य जनावरेही खाणार नाहीत, ते माणसांच्या ताटात देऊन त्यांच्या आरोग्याशी खेळणार का?” असा सवाल यावेळी करण्यात आला. गरीब आणि गरजू कुटुंबांना मिळणाऱ्या रेशनच्या धान्याचा दर्जा तपासण्याची यंत्रणा नेमकी कुठे आहे, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.
या प्रकारामुळे महसूल व पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निकृष्ट धान्याचा पुरवठा नेमका कुठून झाला, संबंधित रेशन दुकानातील साठ्याची तपासणी होणार का आणि दोषींवर कारवाई केली जाणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पुरवठा निरीक्षक प्रियंका सोनकुसळे यांनी नागरिकांची तक्रार गांभीर्याने घेतल्याचे सांगितले. संबंधित तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात येणार असून, भविष्यात नागरिकांना चांगल्या दर्जाचे धान्य मिळावे यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, केवळ तक्रार वरिष्ठांकडे पाठवून हा प्रश्न सुटणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रेशनच्या तांदळाचा दर्जा तपासून निकृष्ट धान्याचा पुरवठा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.