– पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटना खंबीरपणे पाठीशी उभी राहणार: भोकरे
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) : इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी खामगाव येथील ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक, व ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे माजी कार्यकारी संपादक विनोद भोकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सिराज अहमद कुरेशी यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष सैय्यद जाकीर हुसैन यांनी नियुक्तीपत्राद्वारे ही घोषणा केली.
पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासोबतच सर्वसामान्यांच्या समस्या शासन-प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी संघटना सदैव कार्यरत आहे. वंचित, गरजू आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्रभावीपणे मांडण्यासोबतच पत्रकारांच्या विविध न्याय्य हक्कांसाठी ही संघटना काम करते.
नियुक्तीबद्दल आभार व्यक्त करताना विनोद भोकरे यांनी, स्वतंत्र, निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारिता हीच लोकशाहीची मजबूत आधारशिला असल्याचे नमूद केले. पत्रकारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता नेहमी सत्य आणि जनहिताच्या बाजूने ठामपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, पत्रकारांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन कटिबद्ध राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या नियुक्तीबद्दल ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे मुख्य संपादक बाळू वानखेडे, व्यवस्थापकीय संचालक केयूर सांगळे यांनी अभिनंदन केले आहे.