-शिलेदारांची धरपकड, समृद्धी महामार्गावर नाकाबंदी; लिलावाच्या घोषणेने प्रशासन सतर्क
बुलढाणा (सुरेश हुसे) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांनी २७ ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलनाची हाक दिल्याने राज्यातील राजकीय आणि प्रशासकीय वातावरण तापले आहे. एकीकडे तुपकर आंदोलनावर ठाम असताना दुसरीकडे आंदोलक मुंबईत पोहोचू नयेत, यासाठी पोलिस प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक कारवाई सुरू असल्याचे चित्र आहे. तुपकर सध्या ‘भूमिगत’ असल्याची चर्चा असून, बुलढाणा तसेच मुंबई पोलिसांकडून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात असल्याची माहिती आहे.
दरम्यान, २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मंत्रालय परिसरातील मंत्र्यांचे शासकीय बंगले आणि वाहनांचा प्रतीकात्मक जाहीर लिलाव करण्याची घोषणा तुपकरांनी केली आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, प्रशासनानेही खबरदारी वाढविल्याचे दिसून येत आहे.
तुपकरांचा फोन बंद; नेमके कुठे आहेत?
रविकांत तुपकर काल सकाळपासून पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती आहे. त्यांचा मोबाईल फोन बंद येत असून, पोलिसांकडून त्यांच्या ठावठिकाणाचा शोध घेतला जात असल्याचे समजते. मात्र, तुपकर सध्या नेमके कुठे आहेत, याबाबत त्यांच्या समर्थकांकडून कमालीची गुप्तता पाळली जात आहे. दुसरीकडे, ‘काहीही झाले तरी तुपकर आंदोलनस्थळी पोहोचतीलच’, असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईला चकवा देत तुपकर २७ ऑगस्टला मुंबईत पोहोचणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘क्रांतिकारी’च्या शिलेदारांवर पोलिसांची नजर
तुपकरांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईकडे रवाना होणाऱ्या कार्यकर्त्यांवरही पोलिस प्रशासनाचे लक्ष असल्याचे समोर आले आहे. खामगाव येथील क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शुभम राऊत यांना पहाटे त्यांच्या घरातून स्थानबद्ध करण्यात आल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती. त्यानंतर बुलढाणा, खामगाव आणि चिखली परिसरातील संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हालचालींवर पोलिसांकडून लक्ष ठेवले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. काही कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे मुंबईकडे जाण्यापूर्वीच आंदोलकांना रोखण्याची प्रशासनाची रणनीती असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
समृद्धी महामार्गावर पोलिसांचा बंदोबस्त
मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या संभाव्य आंदोलकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी समृद्धी महामार्गावरील टोलनाके तसेच महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आल्याची माहिती आहे. संशयित वाहनांची तपासणी केली जात असून, तुपकर समर्थकांच्या संभाव्य हालचालींवरही नजर ठेवली जात असल्याचे समजते. यामुळे बुलढाण्यातून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गांवर पोलिसांचा वॉच वाढला आहे. मात्र, या सर्व उपाययोजनांनंतरही तुपकरांचे आंदोलन कितपत रोखले जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नोटीस मिळाली, तरी आंदोलनावर तुपकर ठाम
यापूर्वी बुलढाणा शहर पोलिसांनी रविकांत तुपकरांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६८ अन्वये नोटीस बजावली होती. मात्र, पोलिसांची नोटीस, वाढविण्यात आलेला बंदोबस्त आणि कार्यकर्त्यांवरील प्रतिबंधात्मक कारवाईनंतरही तुपकरांनी २७ ऑगस्टला मुंबईत आंदोलन होणारच, अशी भूमिका कायम ठेवली आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांऐवजी दोन लाख रुपये प्रोत्साहन अनुदान द्यावे, पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा, जुन्या कर्जमाफी योजनांपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, तसेच कर्ज पुनर्गठनामुळे कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा योजनेत समावेश करावा, अशा विविध मागण्या तुपकरांनी सरकारसमोर मांडल्या आहेत.
‘शेतकऱ्यांच्या पोरांना तुरुंगात टाकून आवाज दाबता येणार नाही!’
कार्यकर्त्यांवर सुरू असलेल्या कारवाईवर तुपकरांनी सरकार आणि पोलिस प्रशासनावर निशाणा साधला आहे. “शेतकऱ्यांच्या पोरांना तुरुंगात टाकून, अटक करून किंवा स्थानबद्ध करून या चळवळीचा आवाज दाबता येणार नाही. कितीही पोलिस कारवाया करा, आंदोलन थांबणार नाही,” असा इशारा तुपकरांनी दिला आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने दिला असून, सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
उद्या सकाळी १० वाजता काय घडणार?
२७ ऑगस्टच्या आंदोलनासाठी तुपकरांनी घेतलेली आक्रमक भूमिका आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. मंत्रालय परिसरातील मंत्र्यांचे शासकीय बंगले आणि वाहनांचा प्रतीकात्मक जाहीर लिलाव करण्याच्या घोषणेमुळे आंदोलनाची चर्चा अधिकच रंगली आहे. एकीकडे तुपकरांचा शोध सुरू असल्याची माहिती, दुसरीकडे कार्यकर्त्यांची धरपकड, समृद्धी महामार्गावरील वाढविण्यात आलेला पोलिस बंदोबस्त आणि मुंबई पोलिसांची सतर्कता, या पार्श्वभूमीवर २७ ऑगस्टचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर तुपकर मुंबईत पोहोचतात का, ‘क्रांतिकारी’चे कार्यकर्ते आंदोलनस्थळी कशा पद्धतीने पोहोचतात आणि सकाळी १० वाजता जाहीर केलेल्या प्रतीकात्मक लिलाव आंदोलनाचे काय पडसाद उमटतात, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.