– अंढेरा पोलिस ठाणेहद्दीतील खळबळजनक घटनेने बुलढाणा जिल्हा हादरला
– मुलींना ठार मारून नराधम बाप पळून गेला!
चिखली/देऊळगावराजा (रंजना मोरे/ राजेश लोखंडे) – देऊळगावराजा तालुक्यातील अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रुई (जि. वाशिम) येथील रहिवासी व सध्या पुणे येथे खाजगी कंपनीत कामाला असलेल्या राहुल चव्हाण याने आपल्या दोन जुळ्या मुलींचा गळा कापून खून केला व मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या थरारक घटनेने बुलढाणा जिल्हा हादरून गेला आहे.
सविस्तर असे, की आरोपी राहुल चव्हाण याचा पुणे येथे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पत्नीसोबत वाद झाल्याने त्याची पत्नी माहेरी निघून गेली होती. त्यानंतर त्याने दोन मुलींना घेऊन तो दुचाकीने पुण्यावरून रुई जि. वाशिम येथे जात असताना प्रवासादरम्यान पत्नीवरील रागाच्या भरात अंढेरा फाट्याजवळील जंगलात आपल्या दोन जुळ्या मुलींचा गळा कापून निर्दयीपणे खून केला व मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नही केला. त्यानंतर स्वतः राहुल चव्हाण हा वाशिम जिल्ह्यातील आसेगाव पोलिस स्टेशनमध्ये जाऊन त्याने संपूर्ण घटना कबूल केली. ह्या घटनेबाबत वाशीम पोलिसांनी अंढेरा पोलिसांनी याबाबत तत्काळ माहिती दिली असता, अंढेरा पोलिसांनी अंढेरा फाट्याच्या परिसरात जाऊन पाहणी करून पंचनामा केला. घटनास्थळी डीवायएसपी मनिषा कदम, संतोष खराडे, ठाणेदार शक्करगे, पोलिस अधिकारी जारवार, पोफळे, फूसे, जाधव आदी पोहोचले असून, संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना ऐकून परिसरातील नागरिक हादरले असून, दोन निष्पाप बालिकांचा जीव वादातून गेला हे अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
आरोपी राहुल शेषराव चव्हाण, वय ३३ वर्ष, रा. रुई, तालुका, मानोरा, जिल्हा वाशिम हा त्याचे पत्नी व २ जुळ्या मुलींसह पुणे येथे राहत होता. पती व पत्नीत नेहमीच वाद होत असल्याचे कळते. दिनांक २१/१०/२०२५ रोजी पो स्टे अंढेरा हद्दीतील अंढेरा शिवारात महामार्ग क्रमांक येथे दुपारी ०१/०० वा. दरम्यान आरोपीने त्याची मोटरसायकल थांबवून मुलींना रस्त्याच्या बाजूला असलेल्या जंगलात नेले व चाकूने दोघींच्या गळ्यावर वार करून खून केला व मोटरसायकलने पळून गेला. नमूद आरोपी हा त्याचे मूळ गाव रुई, जिल्हा वाशिम येथे जाऊन घडलेली घटना नातेवाईक यांना सांगून पो स्टे आसेगाव, जिल्हा वाशिम येथे हजर होऊन घटनेची माहिती दिली असता पो स्टे आसेगावचे प्रभारी अधिकारी हे त्यांचे स्टापसह पो स्टे अंढेरा येथे येऊन आम्ही आरोपीने दाखवलेल्या ठिकाणी शोध घेतला असता २ मुलींचे सडलेल्या अवस्थेतील प्रेत मिळून आले. फॉरेन्सिक टीमला बोलवून पुढील कारवाई करण्यात येत आहे.