– शेतकर्यांची कर्जवसुली मोहीम थांबवा, अन्यथा आंदोलन; रविकांत तुपकर, रामभाऊ जाधव यांचा इशारा
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – येथून जवळच असलेल्या शिंदी येथील ६५ वर्षीय शेतकर्याने दीपावलीच्या दिवशी शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बॅंकांची सक्तीची कर्जवसुली व सरकारचे शेतकरीविरोधी धोरणामुळे अशा प्रकारे शेतकरी बळी जात असल्याने तीव्र संतापही व्यक्त होत आहे.
शिंदी येथील शिवाजी माणिकराव बुरकूल (वय ६५) हे शेतात गेले असता दुपारच्या सुमारास त्यांनी विषारी औषध प्राशन केले. वडील घरी का आले नाही म्हणून मुले शेताकडे गेले असता, त्यांच्या बाजूला कीटकनाशक औषधाची बाटली आढळून आली. त्यांनी विषारी औषध प्राशन केल्याचा संशय मुलांना आला. त्यांनी प्रथम साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.गोपाल परिहार यांनी बुलढाणा जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. बुलढाणा येथे उपचार सुरू असताना २२ ऑक्टोबर रोजी दुपारी त्यांचे निधन झाले. ग्राम महसूल अधिकारी लखन राजपूत यांनी प्राथमिक अहवाल तयार करून तहसीलदार अजित दिवटे यांच्याकडे पाठविला आहे. शिवाजी माणिकराव बुरकूल यांच्यावर एका खाजगी पतसंस्थेचे ३ लाख कर्ज असून, कर्ज वसुलीसाठी पतसंस्थेने नोटीस बजावली होती. परंतु, पतसंस्थेचे कर्ज भरण्यासाठी त्यांच्याजवळ पैसे नव्हते. यावर्षी अतिवृष्टीमुळे शिंदी भागातील शेती खरडून गेली आहे. पीक काढणीला आले असता पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने सोयाबीन शेंगाला कोंब फुटले, शेतकरी हवालदिल झाला. त्यात खाजगी पतसंस्थेची पठाणी वसूली यामुळे शेतकरी वैतागले आहेत. शिवाजी बुरकुल यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.
शासनाने खाजगी पतसंस्था, सहकारी बँका, भारतीय स्टेट बँक यांची कर्ज वसुली मोहीम थांबवावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर व माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव यांनी दिला आहे.