– चिखली तालुक्याला मिळाले सर्वाधिक १०९ कोटी, आतापर्यंत ४८ कोटींचे शेतकर्यांना वाटप
– पीकविमा हा शेतकर्यांचा हक्क, त्यासाठी सदैव तत्पर राहणार – आ. श्वेताताई महाले
चिखली (राजेश लोखंडे) – जिल्ह्यातील तेरा तालुक्यांमध्ये चिखली तालुका पीकविमा भरपाईबाबत अग्रेसर ठरला असून, चिखली तालुक्याला जवळजवळ १०९ कोटी रुपये पीकविमा भरपाई मंजूर झाली आहे. त्यापैकी ४७ कोटी रुपयांचा पीकविमा वाटप झाला असून, येत्या चार दिवसामध्ये उर्वरित रकमेचे वाटप करण्यात येणार आहे.
सर्वाधिक पीकविमा भरपाई मिळविण्याचा मान यंदाही चिखली तालुक्याने पटकाविला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील इतर तालुक्यांपेक्षा चिखली तालुक्याला मिळालेली पीकविमा नुकसान भरपाई कित्येक करोडो रुपयांनी अधिक असल्याचे चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांचा सतत पाठपुरावा फलदृप झाला, असा अंदाज लावता येतो. आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व परिश्रमामुळे ही भरपाई वेळेत व मोठ्या प्रमाणात मिळवून देणे शक्य झाले. जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत चिखली तालुक्याला सर्वाधिक लाभ मिळाला आहे. यामध्ये चिखली विधानसभा मतदारसंघातील बुलढाणा तालुक्यातील गावांतही समावेश केला तर इतर तालुक्याच्या मानाने चिखली तालुका खूप जास्त समोर असल्याचे दिसून येते. लाभार्थी शेतकर्यांच्या संख्येतही चिखली तालुका आघाडीवर आहे. त्यामुळे चिखली तालुक्यातील शेतकर्यांना दिलासा मिळाला असून, त्यांच्या चेहर्यावर आनंद फुलला आहे. ‘आमदारांच्या प्रयत्नामुळे आमचे हक्काचे पैसे वेळेत मिळाले, आता पुढील हंगामाची तयारी आत्मविश्वासाने करता येईल,’ अशा प्रतिक्रिया शेतकर्यांकडून उमटत आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील शेतकर्यांना यंदा सर्वाधिक पीकविमा भरपाई मिळाली असून, या यशामागे आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे मोठे योगदान आहे. ‘पीक विमा हा शेतकर्यांचा हक्क असून, तो वेळेत मिळवून देण्यासाठी आपण सदैव तत्पर व कार्यरत राहू,’ असे आश्वासन आमदार श्वेताताई महाले यांनी दिले. जिल्ह्यातील तेरा तालुक्यांमध्ये चिखली तालुका आघाडीवर राहिल्याने येथील शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.