– शेळगाव आटोळ येथील दुर्देवी घटना, परिसरात शोककळा
– पीडित कुटुंबीयांना तातडीने मदत देण्याची डॉ. विकास मिसाळ यांची प्रशासनाकडे मागणी
इसरूळ (भिकनराव भुतेकर) – बकर्यांना चारा आणण्यासाठी गेलेल्या युवकाचा नदीच्या पाण्यात पाय घसरून पडल्याने व पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेल्याने दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना काल (दि.१७) चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ येथे घडली. या परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने मिसाळवाडी धरण भरले असून, पाण्याचा प्रवाह नदीत सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीला पूर आलेला आहे. या पुरात वाहून गेल्याने या युवकाचा बळी गेला असून, चेतन वसंता बोर्डे (वय २२) असे या मृतक तरूणाचे नाव आहे. पीडित बोर्डे कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. विकास मिसाळ यांनी चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे यांना दूरध्वनीद्वारे केली आहे. या घटनेने शेळगाव आटोळ, मिसाळवाडीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
चेतन बोर्डे हा आपल्या बकर्यांसाठी पाला आणण्यासाठी गेला असता, नदीकाठी पाय घसरून तो पाण्यात पडला. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला होता, आणि मिसाळवाडी धरण पूर्ण भरले असून, मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले गेल्यामुळे पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान होता. या प्रवाहात तो अंदाजे एक किलोमीटरपर्यंत वाहत गेला. बराच वेळ शोधाशोध केला असता, शेवटी सुभाष सखाराम मिसाळ यांच्या शेताजवळील सिमेंट बंधार्यात त्याचा मृतदेह आढळून आला. मृतदेह पुढील तपासणीसाठी चिखली येथे नेण्यात आल्यानंतर त्याचे शवपरीक्षण करण्यात आले व नंतर नातेवाईकांच्या सुपूर्त करण्यात आला. शेळगाव आटोळ येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्देवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून परिसरात ढगफुटी स्वरूपाचा पाऊस सुरू असून, नद्या-नाले गच्च भरले आहेत. हवामान खात्याने आधीच अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा इशारा दिला होता. तसेच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा धोका असल्याने नागरिकांनी झाडाखाली किंवा नदी-नाल्याच्या काठावर न थांबण्याचे आवाहन तहसीलदार संतोष काकडे व आपत्ती प्रशासनाकडून करण्यात आले होते. सदर मृत्यू झालेला करून अत्यंत गरीब कुटुंबातील असल्याने आपल्या बकर्यांसाठी चारा आणणे त्याला भाग पडले आणि या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. चेतनच्या निधनाने गावावर शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. विकास मिसाळ हे तातडीने पीडित बोर्डे कुटुंबीच्या मदतीला धावून गेले व त्यांचे सांत्वन करत धीर दिला. तसेच, तातडीने तहसीलदारांशी संपर्क साधून पीडित बोर्डे कुटुंबीयांना आर्थिक मदतीची मागणी केली. तहसीलदार संतोष काकडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन शासन पीडित कुटुंबीयांना मदत देईल, असे आश्वासित केले.