– बेल, बेलफळ, धोतरा फुल आणि फळ यांचा प्रवास साखरखेर्डा ते मुंबई!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – व्यवसाय करण्यासाठी केवळ पैसाच लागतो असा दृढ विश्वास प्रत्येकाला आहे; पण साखरखेर्डा येथील वाघमारे कुटुंबाने यावर मात करून केवळ लोकांना कोणत्या दिवशी काय लागते, ही भाविकांची श्रद्धा पाहून चक्क बेलपत्ता, बेलफळ, धोतर्याची फुले, फळे रानातून जमा करून ती चक्क मुंबई येथे विक्रीसाठी नेली आहेत. एका फेरीत १० हजार रूपयांचे उत्पन्न बाजार मिळते, अशी माहिती त्यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना दिली.
साखरखेर्डा येथील माळी पेठेतील ज्ञानेश्वर वाघमारे कुटुंबाने साखरखेर्डा परिसरातील रान माळावर फिरुन बेलाची पानं जमा केली, बेलफळे जमा केली, कोठेही धोतर्याची फुले सर्वत्र मिळून येतात ती जमा केली. त्याची फळे जमा करून वेगवेगळ्या पोतडीत बांधून साखरखेर्डा बसस्थानकावर आला. यात काय आहे, अशी विचारणा केली असता तो म्हणाला की शहरात काहीही विकते. फक्त आपली करण्याची इच्छा लागते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मुंबई हे सोन्याची कोंबडी असून त्याठिकाणी गुजराती, बिहारी, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश या राज्यातून लोक येतात. सोबत काहीच आणत नाही आणि आपला व्यवसाय फुटपाथवर थाटतात. महाराष्ट्र हा सुजलाम आहे. या महाराष्ट्राच्या दर्याखोर्यात अशी काही वनस्पती आहे की, त्याची गरज मुंबईकरांना दररोज आहे. फक्त त्यांना कोणत्या दिवसांत काय लागते याचे ज्ञान अवगत असणे गरजेचे आहे. श्रावण महिना हा हिंदू धर्मासाठी धार्मिक उत्सव साजरा करण्यासाठी महत्त्वाचा महिना मानला जातो. मुंबई शहरात काही फळे, फुले दुर्मिळ असतात. पैसा देऊनही मिळत नाही आणि आपल्याकडे रान माळावर ही वनस्पती मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. ती विकत घ्यावी लागत नाही. फक्त जमा करून तिचे मार्वेâट कसे करता येईल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आठवडाभर रानमाळावर फिरुन बेलाची पाने जमा करणे, फळे तोडून जमा करणे, धोतरा फुले, फळे जमा करून ती एका पोतडीत घेऊन साखरखेर्डा येथून जालना आणि तेथून रात्री मुंबई लोकल ट्रेन पकडून मुंबई येथे जाऊन विक्री करणे. विशेष म्हणजे, मुंबई येथे गेल्यानंतर तेथील स्थानिक किरकोळ व्यापारी यांची वाटच पाहत असतात. रेल्वेतून उतरताच १५० ते २०० रुपये डझन या भावात तेथील व्यापारी खरेदी करतात. ज्ञानेश्वर वाघमारे आणि त्यांची पत्नी दोघेही खांद्यावर पोतडी घेऊन जातात. रविवाररोजी सकाळी अवघ्या काही तासांतच संपूर्ण बेल फळे, पत्ता, धोतर्याची फुले, फळे विकून मोकळी होतात. लागलीच दुपारी परतीच्या प्रवासाला लागतात. यात फक्त मेहनत, चिकाटी आणि जीद्द महत्वाची असून, हे गुण त्यांच्या अंगी दिसून आले. मुंबई शहरात मराठी बांधव मोठ्या प्रमाणात आहेत. दर सोमवारी तेथील महिलांना पूजेसाठी या साहित्याची गरज असते. हे पूजेचे साहित्य ग्रामीण भागात सहज उपलब्ध होते. पण शहरात पैसे खर्च करूनही मिळत नाही. ही बाब ज्ञानेश्वर वाघमारे यांनी हेरली आणि त्यांचा सुरु झाला साखरखेर्डा ते मुंबई प्रवास. हा प्रवास करताना मराठी टीसी रेल्वेत असले की अधिक सुखकर होतो. ते आम्हाला सहकार्य करतात. आमच्यासाठी लोकल ट्रेन म्हणजे मोफत प्रवास करण्याचे साधन. फक्त टीसी सांगतील तेथे आपली पोतडी ठेऊन द्यायची, त्यांचे आमच्यासारख्या फटकळ (फाटके) लोकांसाठी नेहमीच सहकार्य लाभते. पण तो मराठीच टीसी हवा.