– अंढेरा येथील शेतकरी महिला गीताबाई सानप यांची आंबा फळबाग उद्ध्वस्त; सर्वच शेतकरी हतबल!
अंढेरा (अक्रम शेख) – देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा गावाला चारही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र लाभले असले तरी याच वन्यक्षेत्रामुळे शेतकर्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मागील वर्षी पडलेल्या दुष्काळानंतर यावर्षी अंढेरा परिसरात योग्यवेळी पाऊस झाल्याने शेतकर्यांनी मोठ्या आशेने सोयाबीन, मका व इतर खरीप पिके तसेच फळबागा लावल्या आहेत. मात्र, जवळपास १५० ते २०० नीलगाई, रोही व हरिणे या वन्यप्राण्यांना परिसरातील जंगलामध्ये खाण्यासाठी काही नसल्यामुळे हे प्राणी शेतातील खरीप पिकावर व फळबागावर ताव मारून या पिकांचे अतोनात नुकसान करत आहेत. कवळ्या पिकांचा हे वन्यप्राणी अक्षरशः फडशा पाडत आहेत.
अंढेरा येथील शेतकरी गीताबाई उत्तम सानप (गट नंबर १५६, अंढेरा) यांनी केशर व बादाम जातीचे २०० आंब्याचे कलमे लावून फळबाग उभी केली होती. मात्र या बागेचे जंगली प्राण्यांनी अक्षरशः पूर्ण नुकसान केले आहे. शेतकर्याच्या कष्टाचा, पैशाचा व वेळेचा अपार तोटा झाला असून, अजूनही जंगलातील प्राण्यांचा उपद्रव सुरूच आहे. शेतकर्यांनी पिके आणि फळबागा वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केले तरी सरकारी स्तरावर कोणतीही ठोस उपाययोजना नाही. शेतकरीवर्गात यामुळे संतापाचे वातावरण आहे. वन विभाग व महसूल प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, आणि शेतकर्यांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी अंढेरा येथील सर्व शेतकर्यांकडून केली जात आहे.
शेतकर्यांचे नुकसान झाले तर ताबडतोब आॅनलाईन अर्ज करा : वनरक्षक छोले
यासंदर्भात वनरक्षक छोले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की ‘ज्या शेतकर्यांचे नुकसान झाले आहे त्यांनी ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज मुख्य कार्यालयात प्राप्त झाल्यानंतर तो आम्हाला दिला जातो. त्यानंतर सात दिवसांच्याआत पंचनामा करणे बंधनकारक आहे. आता पंचनाम्यासाठी तीन सदस्यीय समितीत दोन नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात एक सरपंच आणि दोन ग्रामसेवक आहेत. त्यामुळे आता समितीत एक वनरक्षक, एक कृषी सहाय्यक, एक तलाठी, एक सरपंच आणि एक ग्रामसेवक असे पाच सदस्य असतील. आज जर अर्ज मिळाला, तर उद्याच आम्ही पंचनामा करून शेतकर्यांचे समाधान करतो, असेही त्यांनी सांगितले.