– वाळूतस्करीच्या वादातून हत्याकांडाचा संशय; घनसावंगी पोलिस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दाखल!
– तढेगाव शिवारात सकाळी सापडला मृतदेह; उजव्या हातावर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – जालना जिल्ह्यातील घनसावंगी पोलिस ठाणेहद्दीतून अपहरण झालेल्या राजाटाकळी (ता. घनसावंगी, जि. जालना) येथील युवकाचा मृतदेह आज (दि. २९) सकाळी तढेगाव शिवारात रस्त्याच्या कडेला आढळून आला. या घटनेने संपूर्ण परिसरात भयाचे वातावरण पसरले होते. सुरेश तुकाराम आर्दड असे या मृत युवकाचे नाव असून, वाळूतस्करीच्या वादातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अज्ञात मारेकर्यांनी सुरेश आर्दड याचा निर्घृण खून करून मृतदेह किनगावराजा पोलिस ठाणेहद्दीतील तढेगाव शिवारात फेकून दिल्याचे दिसून येत आहे.
सविस्तर असे, की सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तढेगाव शिवारात रस्त्याच्या कडेला एक युवक मृतावस्थेत आढळून आला. याप्रकरणी किनगावराजा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली होती. परंतु, आज अधिक तपासादरम्यान या युवकाची ओळख पटली. सुरेश तुकाराम आर्दड, रा. राजा टाकळी, ता. घनसावंगी, जि. जालना असे या युवकाचे नाव असून, त्याच्या खुनासाठी अपहरणाची फिर्याद घनसावंगी पोलिस ठाण्यात २८ जूनरोजीच दाखल झालेली आहे. अज्ञात मारेकर्यांनी या युवकाचे अपहरण केले व त्याचा निर्घृण खून करून मृतदेह किनगावराजा पोलिस ठाणेहद्दीत तढेगाव शिवारात रस्त्याच्याकडेला फेकून दिला. आता मारेकर्यांचा शोध लावण्याचे मोठे आव्हान किनगावराजा व घनसावंगी पोलिसांसमोर आहे. किनगावराजाचे ठाणेदार एपीआय विनोद नरवाडे, पोहेकॉ. विष्णू मुंढे व पोशि सुभाष गीते हे अधिक तपास करत आहेत.
—————–