– आगामी झेडपी, पंचायत समितीची रणनीती निश्चित करणार; विधानसभेची पुनर्रावृत्ती टाळण्यासाठी जोरदार तयारी!
– दि.२८ जूनला सिंदखेडराजा येथील पंचायत समिती सभागृहात दुपारी १ वाजता बैठकीचे आयोजन
सिंदखेडराजा/देऊळगावराजा (सुरेश हुसे) – आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे विदर्भ प्रभारी, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी शनिवारी (दि.२८) पंचायत समिती सभागृह सिंदखेडराजा येथे आपल्या कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीत आगामी निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती ठरविली जाणार असून, डॉ. शिंगणे हे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाआघाडीने लढायचे की स्वतंत्र लढायचे? याचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पक्षप्रमुख शरद पवार यांनी स्थानिक नेत्यांना दिले आहेत. त्यामुळे या बैठकीत डॉ. शिंगणे काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
सिंदखेडराजा-देऊळगावराजा विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री तथा माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांची जोरदार पकड असून, गेल्या विधानसभा निवडणुकीत मराठा मतांच्या झालेल्या मतविभाजनामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विदर्भाची सर्व जबाबदारी डॉ. शिंगणे यांच्या खांद्यावर सोपावली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक महाआघाडी एकत्रितपणे लढणार असल्याचे डॉ. शिंगणे यांनी यापूर्वी बुलढाणा येथे झालेल्या महाआघाडींच्या नेत्यांच्या समन्वय बैठकीत स्पष्ट केलेले आहे. तरीदेखील आघाडीने लढायचे की स्वतंत्र लढायचे? याचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पक्षाने डॉ. शिंगणे यांना स्थानिक पातळीवर दिलेले आहेत. त्यामुळे, शनिवारी (दि.२८) रोजी आयोजित पदाधिकारी, कार्यकर्ते व पक्षाचे लोकप्रतिनिधी यांच्या बैठकीत डॉ. शिंगणे हे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
सिंदखेडराजा येथील पंचायत समिती सभागृहात २८ जूनरोजी दुपारी एक वाजता ही बैठक होणार असून, या बैठकीला सिंदखेडराजा, देऊळगावराजा व चिखली तालुक्यातील परंतु या विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक, पंचायत समिती, जिल्हापरिषद सदस्य व सभापती, बाजार समिती सदस्य व सभापती, खरेदीविक्री संघाचे सदस्य व सभापती, सर्व बूथप्रमुख, सक्रीय कार्यकर्ते यांना या बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे. या बैठकीत शेतकर्यांच्या विविध समस्या व अडचणी, आगामी निवडणुकीची तयारी, संघटनात्मक कामकाज, बूथ पातळीवरील रणनीती, कार्यकर्त्यांच्या सूचना व अडचणी यावर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.