– मतचोरीची नैतिक जबाबदारी स्विकारून फडणविसांनी राजीनामा द्यावा!
– मतचोरी लपविण्यासाठीच ४५ दिवसांत सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय!
मुंबई (धम्मप्रिया कांबळे) – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून भाजप महायुती सत्तेत आल्याचे पुरावे दररोज समोर येत आहेत. राहुल गांधी यांनी सातत्याने या मतचोरीचे प्रकरण लावून धरले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या कामठी मतदारसंघातील मतांचा घोळ उघड केल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढल्याचे उघड झाले आहे. भाजपची मतचोरी पकडली गेल्याने देवेंद्र फडणवीसांनी नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील मतदारयादीत अवघ्या ५ महिन्यांत ८ टक्के वाढ झाली आहे, काही बूथवर ही वाढ २०-५० टक्के झालेली दिसत आहे. अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याचे बीएलओंनी नोंदवले आहे, पण निवडणूक आयोग मात्र गप्प असून, ही मतचोरीच आहे. म्हणूनच काँग्रेस पक्षाने मशीन-रीडेबल डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज त्वरित प्रसिद्ध करण्याची मागणी केलेली आहे. लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झालेल्या भाजप महायुतीला अवघ्या पाच महिन्यात विधानसभा निवडणुकीत प्रचंड मोठा विजय कसा मिळू शकतो, हाच कळीचा प्रश्न आहे. या पाच महिन्यात भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदारयाद्यात घोळ केला, मतदानाची संख्या वाढवली. संध्याकाळी ५ वाजल्यानंतर झालेले मतदान व दुसर्या दिवशी जाहीर केलेली मतदानाची आकडेवारी यात तब्बल ८ टक्क्यांची तफावत आहे. हे मतदान कसे वाढले, याचे समाधानकारक उत्तर आजपर्यंत निवडणूक आयोग देऊ शकलेले नाही. उलट आता माहितीच देता येणार नाही असा नियम बनवला, तसेच ४५ दिवसानंतर सर्व सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्याचा निर्णयही घेतला आहे. हे सर्व मतचोरी लपवण्याचा प्रकार आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.