– शेतकर्यांकडून खंडणीप्रकरणी प्रशांत डिक्करची तुरूंगात रवानगी!
– न्यायालयासमोर जामीन अर्जावर उद्या होणार निर्णय
शेगाव/बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – शेतकर्यांकडून खंडणी उकळण्याच्या आरोपाखाली, स्वतःला शेतकर्यांचा नेता म्हणून घेणार्या प्रशांत डिक्कर याच्याविरोधात शेगाव पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करून त्यांना लगेच अटक करण्यात आली होती. तीन दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर आज, सोमवारी शेगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोर पोलिसांनी त्यांना हजर केले असता, न्यायालयाने डिक्कर याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे डिक्करचा पुढील मुक्काम आता बुलढाणा कारागृहामध्ये राहणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव या प्रकल्पासाठी बाधित गाव नवीन ठिकाणी वसविण्यासाठी गावठाण क्षेत्राकरिता शासनाने शेतकर्यांची शेती घेतलेली आहे. त्यासाठी मोबदला शेतकर्यांना दिला जाणार आहे. मात्र हा मोबदला प्रति हेक्टर ४० लाख रुपये मिळवून देतो, असे आमिष दाखवून शेतकर्यांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप करीत आणखीन पैशासाठी प्रशांत डिक्कर हा त्रास देत असल्याचा आरोप शेतकर्यांनी करीत शुक्रवारी शेगाव येथील जिगाव प्रकल्पाअंतर्गत शेतकरी व अधिकार्यांच्या बैठकीमध्ये प्रशांत डिक्कर याने शेतकरीविरोधी भूमिका घेतल्याने शेतकर्यांनी लोटपाट करीत बैठकीतून हाकलून लावण्याचा प्रकार समोर आलेला होता. त्यावेळी संग्रामपूर तालुक्यातील हिंगणा कवठळ गावाच्या सरपंचा पुष्पा संदीप मोरखडे यांनी याबाबत शेगाव शहर पोलिसात तक्रार नोंदविली. यावरून प्रशांत डिक्कर याच्याविरोधात खंडणीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. शुक्रवारपासून तो पोलिस कोठडीत असून आज, सोमवारी त्याला शेगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे प्रशांत डिक्कर याची रवानगी आता बुलढाणा येथील कारागृहात झाली आहे. प्रशांत डिक्करच्या त्रासाला कंटाळलेल्या शेतकर्यांनी अखेर डिक्करला जेलची हवा दाखवलीच, अशी सर्वदूर चर्चा आहे. शेतकर्यांनी न घाबरता तक्रारी करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.
उद्या जामिनावर होणार निर्णय..
सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाकडून युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने प्रशांत डिक्कर याला न्यायालयीन कोठडीत रवाना केले असले तरी, सोमवारी डिक्कर याच्या वकिलाने जमानतीसाठी शेगाव न्यायालयासमोर अर्ज दाखल केला होता. मात्र पोलिस आणि सरकारी वकील यांचे म्हणणे ऐकल्यानंतरच निर्णय देऊ, अशी भूमिका न्यायालयाची असल्याने डिक्करला जेलची हवा खावी लागली. ज्या शेतकर्यांच्या भरवशावर राजकारण करून डिक्कर हा कथित नेता झाला, त्याच शेतकर्यांनी डिक्करच्या त्रासाला कंटाळून, रडकुंडी येऊन खंडणीची तक्रार दिली. यामुळे शेतकर्यांमध्ये डिक्करविरोधात तीव्र संतापाची लाट दिसून येत आहे. डिक्करच्या जामीनासंदर्भात उद्या शेगाव न्यायालयात निर्णय होईल. अनेक शेतकर्यांनी या खंडणी प्रकरणी जबाब दिले आहेत. व डिक्करविरोधात अजून बरेच शेतकरी तक्रार देण्यासाठी पुढे येण्याची शक्यता आहे.