साखरखेर्डा (अशोक इंगळे) – येथील शेतकरीपुत्र शेख निसार शेख अब्बास वय ३८ वर्ष याने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे आज, दि. २३ मार्च रोजी सकाळी उघडकीस आले.
शेख निसार शेख अब्बास यांच्याकडे वडिलोपार्जित ३ एकर २० गुठ्ठे शेती असून, साखरखेर्डा भाग दोन मध्ये आहे. कोरडवाहू शेती असल्याने खरीप हंगामातील पिकाशिवाय दुसरे पीक घेता येत नाही. त्यामुळे निसार याने छोटासा चहाचा व्यवसाय सुरु केला होता. त्यावर आई, वडील, भाऊ, बहिण, दोन मुले, एक मुलगी, पत्नी असा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असे. शेती व्यवसायात दरवर्षी तोटा सहन करावा लागत असल्याने हाती काहीच लागत नव्हते. या विवंचनेत शेख निसार याने टोकाचे पाऊल उचलले. २२ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता निसार हा घरुन निघून गेला. तो रात्री उशिरापर्यंत परत आला नाही. सकाळी वार्ड क्रमांक एकमधील नागरिकांना दूरवर एका शेतात लिंबाच्या झाडाला कोणीतरी गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळून आले. नागरिकांनी याची माहिती साखरखेर्डा पोलीस स्टेशनला दिली. पोलीस घटनास्थळी गेले असता तो शेख निसार असल्याचे लक्षात आले. साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल बाजीराव खरात यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिंदखेडराजा येथे पाठविण्यात आला होता.