– आजही पिण्याच्या पाण्यासाठी साखरखेर्डावासीयांची भटकंती
– १५ कोटी रूपये पाण्यात?; तरीदेखील अद्याप पाणी मिळेना!
– एकाच योजनेवर तीनवेळा निधी मंजूर; पैसे आले अन् गेले पण पाणी काही मिळाले नाही!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – साखरखेर्डा येथील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गेली पाच वर्षांपासून योजनेचे काम सुरु आहे. ते काम एवढे संथगतीने सुरू आहे की ते काम कधी पूर्ण होणार? याकडे ग्रामस्थांच्या नजरा लागल्या आहेत. तब्बल या योजनेवर १५ कोटींच्या आसपास खर्च होऊनही आजही महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
साखरखेर्डा येथील पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी १९९७ साली ३ कोटी ५० लाखांची योजना तत्कालीन सरपंच रविंद्र पाटील यांनी तत्कालीन आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नातून मंजूर करून आणली होती. वेळोवेळी टाईप लाईन फुटत असल्याने कोराडी धरणावरून पाणीपुरवठा होत नव्हता. यासाठी लोखंडी पाईप लाईन टाकण्यात यावी, अशी मागणी तत्कालीन सरपंच पूनम महेंद्र पाटील यांनी तत्कालीन आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांच्याकडे केली. त्यानंतर २०१६ साली पुन्हा त्या योजनेवर ७ कोटी मंजूर झाले. यात शिक्षक कॉलनीत पाणीपुरवठा करण्यासाठी पाईप लाईन, नवीन जलकुंभ, जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती, कोराडी धरणावरून लोखंडी पाईप लाईन असा योजनेत समावेश होता. आज पाच वर्ष झाले. नवीन लोखंडी पाईप लाईन टाकण्यात ले. जलकुंभ पूर्ण झाले पण जलशुद्धीकरण केंद्र आजही बंद आहे. ते काम सुरु असताना पुन्हा जलजीवन योजनेच्या माध्यमातून ३ कोटी ५० लाख मंजूर झाले. पैसा मिळत गेला. पण ग्रामस्थांना पाणी मिळाले नाही.
जलकुंभ पूर्ण पण पाणी नाही!
साखरखेर्डा येथील शिक्षक कॉलनीत पाणीपुरवठा करण्यासाठी पाच वर्षांपूर्वी जलकुंभ पूर्ण करण्यात आले. पण नियोजन नसल्याने आजही या जलकुंभातून पाणी सोडण्यात आले नाही. फेब्रुवारी महिन्यात अनेकांची बोअरवेल बंद पडली. पिण्यासाठी अगोदरच पाणी विकत घ्यावे लागते, आता वापरण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागणार आहे. याची दखल ग्राम पंचायत पदाधिकार्यांनी घ्यावी.
– अशोक पाटील, ग्रामस्थ
—-
दोन दिवसात शिक्षक कॉलनीत पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल.
– ज्ञानेश्वर चनखोरे, ग्रामविकास अधिकारी, साखरखेर्डा
आज कोराडी धरणावरून पाणीपुरवठा केला जात आहे. आठवड्यातून एक दिवस पाणी नळाला येते. पण जलशुद्धीकरण केंद्र आजही बंद आहे. आज ३० वर्ष झाली जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुध्द झाले नाही. आजही अनेक कामे रेंगाळत पडली आहे. याचे कारण काय! याचा शोध जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घ्यावा. लोखंडी पाईप टाकतांना जुने पाईप काढण्यात आले. त्या पाईपची विल्हेवाट कशी व कधी लावली याचा हिशेब ग्राम पंचायत जवळ नाही.