– योगी आदित्यनाथ सरकारच्या विनंतीनंतर पहाटेचे अमृतस्नान रद्द, ११ वाजेनंतर अमृतस्नान सुरू
– मदत व बचाव कार्य वेगात, पंतप्रधान मोदींकडून तातडीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन
– भाविक बॅरिगेटसमध्ये फसले, त्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याचा संशय
– राहुल गांधी, अखिलेश सिंह यांच्याकडून योगी सरकारच्या नियोजनशून्यतेवर सडकून टीका
प्रयागराज (आवेश तिवारी) – प्रयागराज येथील संगम तटावर काल रात्री दीड वाजता झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत १९ भाविक ठार झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. जखमींना तातडीने रूग्णालयात हलविण्यात आले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन करून मदत व बचाव कार्याचा आढावा घेतला. पहाटेपर्यंत मोदींचे योगींना तब्बल चार फोन झाले होते. या चेंगराचेंगरीत ५० पेक्षा जास्त भाविक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर शासकीय रूग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. चेंगराचेंगरीच्या या दुर्घटनेमुळे योगी सरकारच्या विनंतीनंतर कुंभमेळ्यातील १३ही आखाड्यांनी आजचे पहाटेचे अमृत स्नान रद्द केले असून, ११ वाजेनंतर अमृतस्थान केले जाणार आहे. आजच्या दर्शमौनी अमावस्येदिनी केलेले कुंभ स्नान हे महापुण्यदायी मानले जाते.
प्रयागराज येथील संगम तटाच्या टोकावर ये-जा करणार्या भाविकांसाठी एकच मार्ग असल्याने तेथे गर्दी उसळली. त्यात काही लोकं बॅरिगेटसमध्ये फसले. त्यात काहीजण पडले. त्यामुळे चेंगराचेंगरीची अफवा पसरली. चेंगराचेंगरीत १४ भाविक ठार झाले तर आणखी काही भाविक रूग्णालयात नेत असताना ठार झाले, मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती आहे. चेंगराचेंगरीनंतर एनएसजी कमांडोंनी तातडीने परिस्थिती ताब्यात घेतली व मदत व बचाव कार्याला वेग दिला. ७० पेक्षा जास्त रूग्णवाहिकांद्वारे जखमींना रूग्णालयात नेण्यात आले. रात्रीपासून ते पहाटेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना चार फोन करून मदतकार्याचा आढावा घेतला. दरम्यान, या चेंगराचेंगरीवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी योगी सरकारवर टीकास्त्र डागले असून, ही चेंगराचेंगरी म्हणजे सरकारच्या नियोजनशून्यतेचा परिणाम आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनीदेखील परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासनाला नियोजनासंदर्भात योग्य त्या सूचना दिल्या होत्या.
महाकुंभात आज मौनी अमावस्येनिमित्त अमृत स्नान असून, त्यासाठी देशभरातून ९ कोटी भाविक प्रयागराज (काशी)ला आलेले आहेत. प्रशासनाच्या माहितीनुसार, शहरातील एकूण ४४ घाटांवर १० कोटींपर्यंत भाविक अमृत स्नान करण्याची शक्यता आहे. चेंगराचेंगरीमुळे पहाटेचे स्नान रद्द करण्यात आले होते. तर ११ वाजेनंतर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर अमृत स्नानाला सुरूवात झाली होती.
———–