– निमगांव वायाळ, दिग्रस, दुसरबीड, लिंगा देवखेड, खापरखेड व वझर आघाव येथील बंधारे पडले कोडले!
– आमदार, खासदारांनी राजकीय कटुता दूर करून शेतकर्यांच्या हितासाठी पाणी सोडण्याची मागणी ऐरणीवर!
– पाच-सहा दिवसांत पाणी न आल्यास नदीकाठची पिके हातची जाणार; दुष्काळाचाही गंभीर प्रश्न निर्माण होणार!
दुसरबीड (भगवान नागरे) – मतदारसंघातून वाहत असलेल्या खडकपूर्णा नदीवर सहा कोल्हापुरी बंधारे असून, यावर दोन हजार हेक्टर रब्बी पिकाचे सिंचन आहे. तसेच नदीपात्रातून जवळपास ५० गावांच्या पाणीपुरवठा योजना आहेत. त्यामुळे सध्या नदीपात्रात व कोल्हापुरी बंधार्यात एकही थेंब पाणी नसल्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून शेतकर्यांचे पीक सुकून चालली असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. खडकपूर्णा नदी पात्रात संत चोखा प्रकल्पातून लवकरात लवकर पाणी सोडण्याची मागणी नदीकाठच्या गावातील शेतकरी करीत आहे.
सिंदखेडराजा व देऊळगांवराजा या दोन तालुक्यांतून खडकपूर्णा नदी वाहते, त्यामुळे या खडकपूर्णा नदीवर निमगांव वायाळ, दिग्रस, दुसरबीड, लिंगा देवखेड, खापरखेड व वझर आघाव या सहा ठिकाणी कोल्हापुरी बंधारे असून, यावर्षी भरपूर पाऊस व रब्बी पिकांसाठी पोषक वातावरण असल्याने दोन्ही तालुक्यातील शेतकर्यांनी लगबगीने जवळपास दोन हजार हेक्टरवर रब्बी हंगामातील गहू, कांदा, मका, हरभरा, राजमा या पिकांसह खरबूज, टरबूज असे फळबागाचे पीक शेतकर्यांनी खरिपातील पीक उपटून मोठ्या प्रमाणावर लावगड केली. सदर पिकेही यावर्षी पोषक वातावरण असल्याने बहरात आहे. असे असतांना पाण्याचा उपसाही मोठ्या प्रमाणात झाल्याने सदर पिकांना आता शेवटच्या पाण्याची सक्त आवश्यकता आहे. जानेवारीतच बंधारे संपूर्ण कोरडे पडले, त्यामुळे सदर शेतकर्यांच्या या पिकांना दुसरी पर्यायी व्यवस्था नसल्याने ही पिके धोक्यात आली आहे. यावर्षी वातावरण पोषक व पाणीसुध्दा मुबलक दिसल्याने शेतकर्यांनी हजारो रुपये खर्च करून महागडी बी बियाणे, औषधी व खतांचा वापर केला. त्याप्रमाणे पिकंही चांगली आहेत, पण सदर पिकांना आता शेवटच्या पाण्याची नितांत गरज असतांना व कोल्हापुरी बंधारे कोरडे पडल्याने शेवटचे हे एक पाणी जर या पिकांना मिळाले नाही तर सर्व खर्च व मेहनत वाया जाणार आहे व झालेला खर्च कसा काढायचा, या विवंचनेत शेतकरी दिसत आहेत. यावर्षी अजून पाणी का सुटले नाही? असा प्रश्न आता नदीकाठचे शेतकरी करीत असून, सदर मागणीकडे मतदारसंघाचे आमदार व खासदार तसेच इतर लोकप्रतिनिधी शेतकर्यांकडे लक्ष देत नसल्याचा आरोपही करीत आहे. आता जर दोन चार दिवसामध्ये पाणी सुटले नाही व सदर पिकांना शेवटचे पाणी मिळाले नाही तर शेतकर्यांच्या हातीतोंडी आलेला घास जाणार आहे. खर्चही फिटणार नसल्याची परिस्थिती सध्या तरी निर्माण झाली आहे. तर या कोल्हापुरी बंधार्यावरून जवळपास ५० गावांच्या पाणीपुरवठा योजना असल्याने सदर गावांचा पुन्हा दरवर्षीसारखा गंभीर पाणी प्रश्न उपस्थित होणार आहे. तसेच गुराढोरांचा पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे आता शेतकर्यांचा अंत न पाहता, नदीपात्रात आमदार व खासदारांनी जलसंपदा विभागासोबत चर्चा करून पक्ष व हेवेदावे विरहित शेतकर्यांच्या हितासाठी पुढाकार घेवून धरणातून लवकरात लवकर पाणी सोडावे, अशी रास्त मागणी नदीकाठच्या शेतकर्यांकडून होत आहे.