– लिलावती रूग्णालयात शस्त्रक्रियेनंतर तब्येत स्थीर
– काल मध्यरात्रीची थरारक घटना; हल्लेखोर घरफोडीसाठी घुसल्याचा संशय!
मुंबई (प्रतिनिधी) – चित्रपट अभिनेता सैफअली खान याच्या घरात चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या चोराने धारदार चाकूने जबरी हल्ला केला. सैफवर सहा वार झाले असून, ते सर्व जीवघेणे होते. परंतु, मध्यरात्रीच त्याला तातडीने लिलावती रूग्णालयात हलविण्यात आल्यानंतर शस्त्रक्रिया करून त्याचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. सद्या त्याची प्रकृती स्थीर असल्याची माहिती त्याची पत्नी करिना कपूर- खान हिने दिली आहे. दुसरीकडे, मुंबई पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. मुंबई पोलिसांची क्राईम ब्रँच या प्रकरणाचा तपास करत आहे. त्याच्या घराचे आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले जात आहे.
दरम्यान, मुंबई क्राईम ब्रँचने सैफअली खानच्या घरात काम करणार्या ड्रायव्हर आणि इतरांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या घटनेत हल्लेखोराने मोलकरणीवर आधी हल्ला केला होता. मोलकरीण आणि हल्लेखोर यांच्यातील भांडणाचा आवाज ऐकून सैफ त्याच्या खोलीतून बाहेर आला, त्यानंतर हल्लेखोराने त्याच्यावर हल्ला केला. या हल्लेखोराने सैफअली खानवर धारदार शस्त्राने सहावेळा हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या मानेवर, डाव्या मनगटावर, छातीवर जखमा झाल्या. एवढेच नाही तर मणक्यालाही दुखापत झाली आहे. पाठीच्या कण्याला दुखापत झाल्यामुळे ऑपरेशन करण्यात आले आहे. करिना कपूर-खान हिने सांगितले, की आमच्या घरात अज्ञात व्यक्ती घुसला. त्यानंतर सैफ अली खान आणि घुसखोर यांच्यात बाचाबाची झाली. यात सैफवर चाकूने वार करण्यात आल्याने तो जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रात्री तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास गंभीर जखमी अवस्थेत सैफअली खानला लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. लिलावतीचे सीईओ नीरज उत्मानी यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, ‘सैफअली खान यांना पहाटे ३ ते ३.३० वाजता लिलावती हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. त्याला सहा जखमा झालेल्या, त्यापैकी दोन गंभीर आहेत. एक दुखापत त्यांच्या मणक्याजवळ आहे. तर मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘काल रात्री उशिरा अभिनेता सैफ अली खानच्या घरी अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला आणि त्याच्या मोलकरणीसोबत वाद घातला. जेव्हा सैफने हस्तक्षेप करून त्या व्यक्तीला शांत करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने सैफ अली खानवर हल्ला करून त्याला जखमी केले. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.’ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले, की ‘सैफ अली खान यांच्यावरील हल्ला ही चिंताजनक घटना आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिकृत निवेदन येऊ द्या.’
सगळ्यात आधी चोराला मोलकरणीनं पाहिलं
सैफ अली खान त्याच्या वांद्रे येथील घरात गाढ झोपेत होता. करीना कपूर आणि तिच्या कुटुंबातील इतर सदस्यही या घरात होते. अचानक घरात चोर घुसला. सगळ्यात आधी मोलकरणीने चोराला पाहिलं आणि चोराला पाहून ती मोठमोठ्याने ओरडू लागली. तिनं चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात चोर चाकू घेऊन तिच्याकडे धावला. चोराने वार करायचा प्रयत्न तिनं तो वार आपल्या हातावर झेलला. माहितीनुसार मोलकरीण तेव्हा सैफच्या मुलांसोबत होती.
———–
VIDEO | Here's what a forensic official said after leaving actor Saif Ali Khan's residence in Bandra, Mumbai:
"We are from the fingerprint department, and we have successfully collected fingerprints. The next steps in the process will be decided by our seniors."
Actor Saif Ali… pic.twitter.com/FWkMTw2kpH
— Press Trust of India (@PTI_News) January 16, 2025