– संघटनेची किनगावजट्टू येथे राज्यातील पहिली शाखा स्थापन
बिबी (ऋषी दंदाले) – जीवाचं रान करून क्रांतीकारी शेतकरी संघटना गावागावांत पोहोचविणार आहे, अशी निसंदिग्ध ग्वाही क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते सहदेव लाड यांनी दिली. संघटनेची राज्यातील पहिली शाखा किनगावजट्टू येथे स्थापन झाली आहे. या शाखेच्या नामफलक अनावरणप्रसंगी ते बोलत होते. तर परिसरातील शेतकर्यांनी सहदेव लाड यांच्यासारखे नेतृत्व घडविल्याचा अभिमान आहे, असे प्रतिपादन याप्रसंगी शेतकरी नेते व संघटनेच जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी दिली.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पहिल्या शाखेच्या नामफलकाचे लोणार तालुक्यातील किनगावजट्टू येथे सहदेव लाड यांच्याहस्ते व शेतकरी नेते डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या प्रमुख उपस्थितीत अनावरण करण्यात आले. शेतकर्यांच्या प्रश्नावर गेल्या २० वर्षापासून रस्त्यावरची लढाई लढून आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला व प्रशासनाला गुडघे टेकण्यास भाग पाडणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेची ही राज्यातील पहिलीच शाखा आहे. शाखेच्या फलकाचे अनावरण रविकांत तुपकर यांच्यासोबत गेल्या सहा वर्षांपासून एकनिष्ठ व कट्टर असलेले किनगावजट्टू परिसरातील सहदेव लाड यांच्याहस्ते करण्यात आले. प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ.ज्ञानेश्वर टाले हे होते. तसेच शाखा उद्घाटन सोहळ्याला गावातील शेतकरी व क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे तालुक्यातील प्रमुख पदाधिकारीसुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शेतकरी नेते सहदेव लाड यांच्यासारखे नेतृत्व या भागातील शेतकर्यांनी जिल्ह्याला दिले. आगामी निवडणुकांत संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन याप्रसंगी डॉ. टाले यांनी केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने शेतकरी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.