चिखली (विनोद खोलगडे) – सुतार समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन होणे ही काळाची गरज आहे. या अधिवेशनातून सुतार समाजाच्या व्यथा सरकार दरबारी पोहोचतील. या माध्यमातून सरकारचे लक्ष समाजाच्या प्रश्नांकडे वेधण्याचे प्रयत्न करू, असे प्रतिपादन सुतार तथा बारा बलुतेदार समाजाचे नेते सतिश शिंदे यांनी केले. ‘ब्रेकिंग महाराष्ट्र ग्रूप’चे अध्यक्ष तथा वरिष्ठ संपादक, उद्योजक पुरूषोत्तम सांगळे हे चिखली येथे आले असता, श्री शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी चर्चा करताना श्री शिंदे हे बोलत होते. चिखली एमआयडीसी येथे ‘महाराष्ट्र ईव्ही डील’ या कंपनीच्या नियोजित प्रकल्पात सुतार समाजातील जास्तीत जास्त तरुण-तरुणींना नोकर्या द्याव्यात, अशी विनंतीही त्यांनी श्री सांगळे यांच्याकडे केली.
याप्रसंगी सतिश शिंदे म्हणालेत, की सुतार समाजाचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी राज्यस्तरीय अधिवेशनाचा घाट घातला आहे. यातून समाजाची वङ्कामूठ तर आवळता येईलच, पण समाजाच्या समस्या सरकार दरबारी पोहोचविता येतील. समाजाचे ठराव सरकारकडे गेले तर त्यावर काही तरी हालचाल होईल. त्यासाठी दि.१ जानेवारी २०२३ रोजी औरंगाबाद येथील समाज बांधवांच्या बैठकीत फक्त सुतार समाज केंद्रस्थानी ठेवून समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन व्हावे, ही भूमिका मांडली होती. या भूमिकेचे स्वागत करतांना समाज बांधवानी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. यानंतर ८ जानेवारीला पुणे येथे याबाबतीत राज्यस्तरीय बैठकीत चर्चा करण्यात आली.
प्रत्येक जिल्ह्यात याबाबतीत मेळावे घेऊन समाजातील शेवटच्या बांधवांना या अधिवेशनाची माहिती दिली जात आहे. २९ जानेवारीरोजी अधिवेशन बाबतीत नाशिक येथील राज्यस्तरीय बैठकीत राज्यातील विभागनिहाय मेळावे आयोजित करण्यात यावे, असेही मत मांडले गेले. अधिवेशनाबाबत समाज बांधवांमध्ये उत्साह जाणवला असून, सदर अधिवेशन यशस्वी करण्याचा निर्धार समाज बांधव व्यक्त करत आहेत, अशी माहितीही शिंदे यांनी दिली. आज समाजात अनेक नेते असले तरी समाजाला एक नेता नाही. त्यामुळे सर्वच नेत्यांनी एकत्र येऊन या अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनदेखील सतीश शिंदे यांनी केले आहे.
सुतार समाजाने आतापर्यंत स्वतःचा कलेने इतरांचे दिवाणखाने सजविण्याचे काम केलें. परंतु, आता मात्र स्वतः च्या समाजाला आकार देण्यासाठी व आपला राजकीय वाटा मागण्यांसाठी ते सज्ज झाले आहेत. युवकांमध्ये प्रचंड जागरूकता निर्माण झाली आहे, हे अधिवेशन नक्कीच यशस्वी होईल, असा आशावाद समाज बांधव व्यक्त करत आहेत, असेही सतिश शिंदे म्हणालेत.
‘महाराष्ट्र ईव्ही डील’च्या चिखलीतील नियोजित प्रकल्पात सुतार समाजातील तरुण-तरुणींना जास्तीत जास्त नोकर्या द्या : सतिश शिंदे
चिखली येथील औद्योगिक वसाहतीत ‘महाराष्ट्र ईव्ही डील्स’ या कंपनीचा तब्बल १५ कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला प्रकल्प नियोजित आहे. या प्रकल्पात सुतार समाजातील पात्र तरुण व तरुणींना जास्तीत जास्त नोकर्या द्याव्यात, अशी मागणी याप्रसंगी सतिश शिंदे यांनी केली आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स उभे करण्याचे काम ‘महाराष्ट्र ईव्ही डील्स’ करते. तसेच, ईव्ही मार्केटिंग क्षेत्रातील सर्वोत्तम तांत्रिक सल्लागार (टेक्निकल एडव्हायझर) म्हणूनही या कंपनीचे काम सुरू आहे. पुढील पाच वर्षात समृद्धी महामार्गासह औरंगाबाद – जळगाव महामार्गावर जास्तीत जास्त चार्जिंग स्टेशन्स उभे करण्यासह ईव्ही सोल्यूसन्स निर्माण करण्याचे लक्ष्य कंपनीने ठेवलेले आहे. चिखली येथे या कंपनीचा प्रकल्प नियोजित असून, त्यासाठीची प्राथमिक पाहणी व तांत्रिक शक्यता कंपनीचे अध्यक्ष तथा वरिष्ठ संपादक पुरूषोत्तम सांगळे यांनी केली. या प्रकल्पाबद्दल सुतार समाजाचे नेते सतिश शिंदे यांनी समाधान व्यक्त केले आहे.
——————–