– बुलढाणा जिल्हाधिकार्यांच्याकडून शासकीय सुट्टी जाहीर
– मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांचे लाभणार मुख्य मार्गदर्शन
– हेलिकॉप्टरद्वारे होणार जिजाऊ जन्मस्थळावर पुष्पवृष्टी
सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी) – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांसह छत्रपती संभाजीराजेंना घडविणार्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मॉसाहेबांचा जन्मोत्सव सोहळा उद्या (दि.१२) मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीत जल्लोषात पार पडणार असून, त्यासाठी सिंदखेडराजा नगरी सज्ज झाली आहे. मराठा सेवा संघाच्यावतीने या जन्मोत्सवाची जय्यत तयारी पार पडली आहे. जिजाऊ सृष्टी व राजमाताचे जन्मस्थान असलेला राजवाडा नटला असून, मुख्य सोहळ्यात मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. पुरूषोत्तम खेडेकर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार असून, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्यास लाभणार आहे. यासह विविध पक्षीय नेत्यांची मांदियाळी या ठिकाणी लाभणार आहे. जन्मोत्सवानिमित्त बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. तसेच, लखुजीराजे जाधव राजवाड्यावर १२ जानेवारीला हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. अभिता लॅन्ड सोल्यूशन कंपनीने यासाठी पुढाकार घेतला आहे. मराठा सेवा संघातर्पेâ दिल्या जाणार्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यंदा कांतराव देशमुख यांना मराठा कृषी उद्योजक, स्नेहा कोकणे यांना मराठा क्रीडा भूषण तर ज्ञानेश्वर घोडके यांना मराठा कृषी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
जिजाऊ मॉसाहेबांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी, ही कोट्यवधी शिवभक्तांची मागणी यंदा पहिल्यांदाच पूर्ण झाली असून, माँ जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्हा प्रशासनाने उद्या, १२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. लोकभावनेला योग्य न्याय देण्याचा सन्मान जिल्हाधिकारी डॉक्टर एचपी तुम्मोड यांना मिळाला आहे. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच स्थानिक सुट्ट्यांमध्ये जिजाऊ जयंतीला समाविष्ट करण्यात आले आहे. जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करता यावा, हाच उद्देश या सुट्टी मागचा आहे. या जन्मोत्सव सोहळ्यासाठी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे देश-विदेशातील लाखो शिवभक्त येत असतात.
यंदा या सोहळ्याची वातावरणनिर्मिती सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सवाने झाली आहे. या अंतर्गत ४ ते १० जानेवारीदरम्यान सिंदखेडराजा परिसरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यर्थ्यांनी विविधरंगी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यानंतर महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्पेâदेखील १० व ११ जानेवारीला जिजाऊ गाथा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. आता बुधवारी सकाळी ९ ते संध्याकाळी ४ दरम्यान कीर्तन महोत्सव पार पडणार असून, संध्याकाळी साडेपाच वाजता राजवाड्यावर दीपोत्सव तर त्यानंतर राजवाडा ते जिजाऊ सृष्टीदरम्यान मशाल यात्रा काढण्यात येणार आहे. रात्री साडेआठला महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत.
उद्या, १२ तारखेला सकाळी ६ वाजता लखुजीराजे जाधव यांच्या राजवाड्यात महापूजा, ७ वाजता पालखीसह वारकरी दिंडी, ९ वाजता शिवधर्म ध्वजारोहण आणि दुपारी दीड वाजेपर्यंत शाहिरांचे पोवाडे, सत्कार सोहळे, प्रकाशन सोहळे, सामूहिक विवाह सोहळा आदी भरगच्च कार्यक्रम सादर होणार असून, मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कक्षांचे प्रदेशाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष या सर्व कार्यक्रमांचे नियोजन पाहात आहेत. दुपारी २ ते ६ वाजता शिवधर्म पीठ येथे आयोजित मुख्य सोहळ्यात छत्रपती उदयनराजे भोसले व मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचे होईल. या सोहळ्यास बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार अरविंद सावंत, बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, जळगावच्या खासदार रक्षा खडसे, ज्ञानेश्वर पाटील, आ. राजेंद्र शिंगणे, शिवसेना नेते सुभाष देसाई, आ. संजय कुटे, आ. संजय रायमूलकर, आ. श्वेता महाले, आ. संजय गायकवाड, आ. आकाश फुंडकर, आ. राजेश एकडे, वसंत खंडेलवाल, किरण सरनाईक आदी नेते हजर राहणार आहेत. याशिवाय नगराध्यक्ष सतीश तायडे, मराठा सेवा संघाचे कामाजी पवार, प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, महासचिव मधुकर मेहेकरे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
हेलिकॉप्टरद्वारे जिजाऊ जन्मस्थळावर पुष्पवृष्टी
राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवानिमित्त लखुजीराजे जाधव राजवाड्यावर १२ जानेवारीला हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. अभिता लॅन्ड सोल्यूशन कंपनीने यासाठी पुढाकार घेतला असून, यासाठी कंपनीचे संस्थापक अध्यक्ष सुनील शेळके हे मुंबई येथून हेलिकॉप्टरने येणार आहेत. पुष्पवृष्टी करतेवेळी त्यांची कन्या अभिता शेळके सोबत असणार आहे. याचा ‘टीझर’ समाजमाध्यमांवर वेगाने प्रसारित होत असून, दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्षा जयश्री शेळके यांनी रोजगार मेळावाही आयोजित केला आहे.