Breaking newsBULDHANAHead linesMaharashtraMumbaiVidharbha

मंत्रिमंडळ विस्तार कधी?; शिंदे गटातील आमदारांची धुसफूस?

– शिंदे गटासह भाजपच्या आमदारांनाही लागले मंत्रिपदाचे वेध!
– मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार करावा – आ. संजय गायकवाड

मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागलेले असून, त्यावरून अंतर्गत धुसफूसही सुरू असल्याचा राजकीय सूर उमटत आहे. काल शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी २२ जानेवारीपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे सांगितले असतानाच, आता बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनीदेखील मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात लवकर करावा, अशी मागणी केली आहे. मंत्रिमंडळ विस्तार गेल्या ४ महिन्यांपासून लांबला आहे, त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार करावा, अशी मागणी संजय गायकवाड यांनी केली.

शिंदे गटातील अनेक आमदारांना मंत्रिपदाचे वेध लागलेले आहे. त्यामुळे जागा कमी व संख्या जास्त, असे चित्र शिंदे गटात आहे. दुसरीकडे, भाजपमध्येदेखील अनेक नेत्यांना मंत्रिपदी संधी हवी आहे. शिवाय, महिला आमदारांनादेखील मंत्रिपद द्यायचे आहे. विदर्भातील एकमेव महिला आमदार असलेल्या भाजपच्या चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांना महिला व बालकल्याण मंत्रिपदी संधी मिळेल, अशी मुंबईतील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर, दुसरीकडे, प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळेल, असा शब्द यापूर्वीच मिळालेला आहे. परंतु, विस्तारच होत नसल्याने तेदेखील मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहेत. त्यानंतर आता बुलडाणा जिल्ह्यातील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनीही मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होत असल्याचे मान्य करत, लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार करण्याची मागणी केली आहे.

आ. गायकवाड म्हणाले, की मंत्रिमंडळ विस्ताराला आधीच खूप उशीर झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार करावा. दरम्यान, त्यांनी यावेळी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचादेखील समाचार घेतला. सरकार फेब्रुवारीचा महिना पाहाणार नाही. आमदारांमध्ये नाराजी आहे. सरकार लवकरच पडेल, असे राऊत म्हणाले होते. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आ. गायकवाड म्हणाले, की ‘हे सरकार २०२४ पर्यंत आपला कार्यकाळ पूर्ण करेल, शिवाय २०२४ ते २०२९ पर्यंत पुन्हा हे सरकार येईल आणि त्या सरकारमध्ये आम्ही असू’ असे भाकीत संजय राऊत यांच्या विधानावर प्रत्युत्तर देताना संजय गायकवाड यांनी वर्तवले आहे.


राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा केवळ शिंदे गटातील आमदारांनाच नाही तर भाजपमधील आमदारांनादेखील आहे. भाजपचे अनेक आमदार आपल्याला मंत्रिमंडळात संधी मिळेल, अशी अपेक्षा ठेवून आहेत. या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळाली नाही तर मात्र शिंदे गटातील अनेक आमदार पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे परत जाऊ शकतात. त्यामुळे चलाखीने मंत्रिमंडळ विस्तार लांबविला जात असल्याची चर्चा मुंबईतील राजकीय वर्तुळात होत आहे.
———————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!