-७ हजार ६५८ शेतकऱ्यांच्या ५ हजार ४८९ हेक्टर पीक नुकसानीसाठी मदत; रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार
बुलढाणा (सुरेश हुसे) : जून आणि जुलै २०२६मध्ये झालेल्या अतिवृष्टी, पूरस्थिती, चक्रीवादळ आणि गारपिटीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने २३ कोटी ३३ लाख ३१ हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्याला तब्बल १० कोटी ७८ लाख ५७ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून, राज्यातील जिल्ह्यांमध्ये बुलढाण्याला सर्वाधिक मदत मिळाली आहे. जिल्ह्यातील ७ हजार ६५८ शेतकऱ्यांच्या ५ हजार ४८९.९१ हेक्टर क्षेत्रावरील पीक नुकसानीसाठी ही मदत दिली जाणार आहे.
मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी ही माहिती दिली. नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीचा आधार मिळावा, यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. मदत व पुनर्वसन विभागाने २७ ऑगस्ट रोजी शासन निर्णय काढून राज्यातील ११ हजार २०७.७९ हेक्टर क्षेत्रावरील पीक नुकसानीसाठी १७ हजार २४५ शेतकऱ्यांना २३ कोटी ३३ लाख ३१ हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे.
अमरावती विभागातील शेतकऱ्यांसाठी १३.८० कोटी
अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यांतील ९ हजार ६८३ बाधित शेतकऱ्यांसाठी १३ कोटी ८० लाख ७४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातील तब्बल १० कोटी ७८ लाख ५७ हजार रुपये एकट्या बुलढाणा जिल्ह्याच्या वाट्याला आले आहेत. पुणे विभागातील पुणे व सातारा जिल्ह्यांतील ६ हजार ५६५ शेतकऱ्यांसाठी ९ कोटी १३ लाख २२ हजार रुपये, नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील ६६१ शेतकऱ्यांसाठी ३८ लाख ८७ हजार रुपये, तर कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६ शेतकऱ्यांसाठी ४१ हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.
मदत थेट खात्यात; कर्जवसुलीसाठी वापरता येणार नाही
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणारी मदत डीबीटीच्या माध्यमातून थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, ही मदत जुन्या कर्जाच्या परतफेडीसाठी किंवा कर्जवसुलीसाठी वळती करू नये, अशा स्पष्ट सूचना बँकांना देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या हातात येणारा निधी शेती आणि कुटुंबाच्या गरजांसाठी वापरण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
दुबार लाभाला आळा
एकाच नुकसानीसाठी एका शेतकऱ्याला दुबार लाभ मिळणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. यापूर्वी त्याच हंगामातील त्याच क्षेत्रासाठी मदत मिळालेल्या लाभार्थ्यांची पडताळणी करूनच पुढील मदत वितरित केली जाणार आहे. मदत वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी आणि वितरित निधीचा तपशील संबंधित जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत.
‘शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासन कटिबद्ध’
“नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा हात मिळणे आवश्यक आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मंजूर निधीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळेल,” असे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितले. अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झालेल्या हजारो शेतकऱ्यांसाठी शासनाच्या या निर्णयामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, मंजूर मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होते, याकडे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.