-झोन दाखला मिळवून देण्यासाठी ९ हजार रुपये घेतल्याचा आरोप; नगर परिषदेतील तिघांसह फायनान्स प्रतिनिधीविरुद्ध गुन्हा
शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : शेवगाव नगर परिषदेच्या अधिकृत कागदपत्रांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नगर परिषदेच्या नावाने बनावट झोन दाखला तयार करून त्यावर मुख्याधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करण्यात आली. तसेच नगर परिषदेच्या अधिकृत शिक्क्याचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. बांधकामासाठी झोन दाखला मिळवून देण्याच्या नावाखाली ९ हजार रुपये घेतल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी नगर परिषदेतील तीन वसुली लिपिकांसह आय.के.एफ. फायनान्सचे प्रतिनिधी समीर शहा (पूर्ण नाव माहीत नाही) अशा चौघांविरुद्ध शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विजया दत्तात्रय घाडगे यांनी २५ ऑगस्ट रोजी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार तुराबअली शौकतअली सैय्यद (रा. पैठण), हबीब सुन्ना शेख (रा. नाईकवाडी मोहल्ला, शेवगाव), ज्ञानेश्वर प्रल्हाद भारस्कर (रा. साठेनगर, पैठण रोड, शेवगाव) आणि समीर शहा (आय.के.एफ. फायनान्स) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
झोन दाखला पाहताच बनावटपणा उघड
फिर्यादीनुसार, २३ जुलै रोजी महेशर मन्सूर कुरेशी हे नगर परिषदेत आले होते. त्यांनी त्यांच्याकडील झोन दाखला मुख्याधिकारी विजया घाडगे यांना दाखवून आपली फसवणूक झाल्याचे सांगितले. दाखल्याची पाहणी केली असता त्यावरील स्वाक्षरी आपली नसल्याचे मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर नगर परिषदेच्या नावाने बनावट दस्तऐवज तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला.
जागा ग्रीन झोनमध्ये; तरीही दाखला देण्याचा दावा
महेशर कुरेशी यांना घराच्या बांधकामासाठी कर्जाची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी समीर शहा यांच्याकडे कर्जप्रकरण केले होते. कर्जासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये झोन दाखल्याची मागणी करण्यात आली होती. कुरेशी यांनी त्यांच्या वडिलांच्या नावावरील गट क्रमांक १६२८ व जुना सर्व्हे क्रमांक २१८ मधील जागेसाठी नगर परिषदेकडे झोन दाखला मागितला होता. मात्र, संबंधित जागा ग्रीन झोनमध्ये असल्याने बांधकामासाठी झोन दाखला देण्यात आलेला नव्हता, असे फिर्यादीत नमूद आहे.
९ हजार रुपये घेतल्याचा आरोप
झोन दाखला मिळत नसतानाही तो मिळवून देण्याचे आश्वासन देऊन संबंधितांनी कुरेशी यांच्याकडून ९ हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी असलेला झोन दाखला तयार करण्यात आला. या दाखल्यावर नगर परिषदेचा अधिकृत शिक्काही मारण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
नगर परिषदेचा अधिकृत शिक्का बाहेर गेला कसा?
या प्रकारामुळे नगर परिषदेच्या अधिकृत शिक्क्याच्या सुरक्षिततेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. अधिकृत शिक्का कोणाच्या ताब्यात होता, मुख्याधिकाऱ्यांची स्वाक्षरी बनावट करण्यासाठी संबंधितांकडे कोणती माहिती किंवा कागदपत्रे होती, तसेच बनावट दाखला तयार करण्यासाठी नगर परिषदेतील आणखी कोणाची मदत झाली का, याचा तपास आता पोलिसांकडून केला जाणार आहे.
आणखी बनावट कागदपत्रे तयार झाली का?
हा प्रकार केवळ एका झोन दाखल्यापुरता मर्यादित आहे की नगर परिषदेच्या नावाने अशाच पद्धतीने आणखी बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली आहेत, याबाबतही तपास होणे आवश्यक आहे. संबंधितांचे कागदपत्रे, मोबाईल संपर्क आणि आर्थिक व्यवहार तपासल्यास या प्रकरणामागील संपूर्ण साखळी समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६५२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३३५, ३३६(३), ३४०(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.