-हिंदू-मुस्लिम बांधवांनी जपली सामाजिक बांधिलकी; सर्वधर्मसमभावाचा दिला संदेश
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : संपूर्ण जगाला प्रेम, शांती, दया आणि मानवतेचा संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्या जयंतीनिमित्त (ईद-ए-मिलादुन्नबी) ‘खिदमते खल्क फाउंडेशन’च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, तब्बल १४० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीतून प्रेरणा घेत ‘मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा’ या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सध्या रक्ताचा तुटवडा भासत असताना गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी फाउंडेशनने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद ठरला.
हिंदू-मुस्लिम बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग
या रक्तदान शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ मुस्लिम बांधवांनीच नव्हे, तर हिंदू बांधवांनीही मोठ्या संख्येने सहभागी होत रक्तदान केले. दुय्यम ठाणेदार संदीप मेधने, विक्की जगताप, श्याम खरात, डॉ. प्रवीण ठोसरे, मंगलसिंग मोहने, दीपक खरात आणि मयूर जयस्वाल यांच्यासह अनेक हिंदू बांधवांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. या सहभागातून सर्वधर्मसमभाव आणि जातीय सलोख्याचे उदाहरण समाजासमोर आले. ‘रक्ताला कोणताही धर्म किंवा जात नसते; ते केवळ माणसाचा जीव वाचवते,’ असा संदेश यावेळी उपस्थित मान्यवर आणि रक्तदात्यांनी दिला.
सकाळपासून रक्तदात्यांची गर्दी
सकाळपासूनच शिबिराच्या ठिकाणी रक्तदानासाठी तरुणांसह नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. रक्तसंकलनासाठी तज्ज्ञ वैद्यकीय पथक तसेच वाशिम ब्लड सेंटरचे संचालक प्रकाश सांगळे, डॉ. कृष्णा सांगळे, संकेत, सुजाता यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्याला आयोजकांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, टी-शर्ट आणि पेन देऊन गौरविण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यासाठी खिदमते खल्क फाउंडेशनचे शे. राजीक, मो. इशरत, मो. समीउलहक, राजू शे. कमर, आबिद पठाण, सिकंदर पठाण, अर्शद आदी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले. या सामाजिक उपक्रमाबद्दल परिसरातील विविध स्तरांतून फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक होत आहे.