-महागडी कीटकनाशके घेऊन फवारणीला वेग; योग्य औषध व अळीच्या अवस्थेबाबत कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची गरज
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : साखरखेर्डा परिसरासह संपूर्ण सिंदखेडराजा तालुक्यात यंदा सोयाबीनच्या पेरणीचे क्षेत्र वाढले असून, जुलै महिन्यात झालेल्या संततधार व रिमझिम पावसामुळे पिकांची वाढ जोमाने झाली. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अळीचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी महागडी कीटकनाशके खरेदी करून फवारणीला सुरुवात करीत असले तरी नेमकी कोणती औषधे आणि कोणत्या अवस्थेत फवारावीत, याबाबत कृषी विभागाने बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
सिंदखेडराजा तालुक्यासह साखरखेर्डा परिसरात शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा पारंपरिक सोयाबीन पिकाला पसंती दिली आहे. जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी असतानाही शेतकऱ्यांनी निसर्गाशी दोन हात करीत पेरणी सुरू ठेवली. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर पेरणीला वेग आला आणि बहुतांश शेतकऱ्यांनी १५ जुलैपर्यंत पेरणी पूर्ण केली. त्यानंतर जुलै महिन्यात अधूनमधून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे पिकाला पोषक वातावरण मिळाले. योग्य वेळी निंदणी, डवरणी आणि अन्य व्यवस्थापनाची कामे झाल्याने सोयाबीनचे पीक चांगले बहरले. nमात्र, पिकाची वाढ जोमात होत असतानाच आता अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना पुन्हा खर्चाचा सामना करावा लागत आहे. सकाळपासूनच कृषी सेवा केंद्रांवर कीटकनाशके खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत असून, अनेक शेतकरी उधारीवर औषधे घेऊन फवारणी करीत आहेत. मात्र, पिकावर कोणत्या प्रकारची अळी आहे, तिची अवस्था कोणती आहे आणि त्यानुसार कोणते कीटकनाशक वापरावे, याबाबत अनेक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याची स्थिती आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही कृषी सेवा केंद्रांकडून योग्य सल्ला दिला जात आहे; मात्र काही ठिकाणी गरज नसतानाही महागडी औषधे घेण्याचा सल्ला दिला जात असल्याची तक्रार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत आहे. याशिवाय तणनाशकांच्या चुकीच्या वापरामुळे काही ठिकाणी पिकांवर विपरीत परिणाम झाल्याचेही शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे कोणत्याही औषधाची फवारणी करण्यापूर्वी पिकाची अवस्था, अळीचा प्रकार आणि औषधाची मात्रा याबाबत तज्ज्ञांकडून खात्रीशीर मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे.
दरम्यान, तालुक्यात कोणत्या पिकाची किती क्षेत्रावर लागवड झाली आहे, पिकांची सद्यस्थिती काय आहे आणि कोणत्या भागात कोणत्या किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे, याचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचण्याची गरज आहे. केवळ कृषी सेवा केंद्रांवरील सल्ल्यावर अवलंबून न राहता कृषी सहायक आणि कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. सोयाबीनचे पीक सध्या चांगल्या अवस्थेत असताना अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जाऊ नये, तसेच चुकीच्या औषधांच्या फवारणीमुळे पिकाचे नुकसान होऊ नये, यासाठी कृषी विभागाने तातडीने मार्गदर्शन मोहीम राबवावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.