-हरिनामाच्या जयघोषाने वडमुखवाडी परिसर दुमदुमला; महापूजा, आरती व प्रसादाचे आयोजन
आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदी-पुणे रस्त्यावरील वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे परतीच्या प्रवासात हरिनामाच्या जयघोषात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. पंढरपूरहून आळंदीकडे परतणाऱ्या माऊलींच्या वैभवी पादुका पालखी सोहळ्याने मंदिरात विसावा घेतला. यावेळी मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या प्रथा-परंपरांचे पालन करीत माऊलींच्या पादुकांचा पालखी सोहळा हरिनामाच्या जयघोषात मंदिरात दाखल झाला. पालखी सोहळ्याचे मालक ऋषिकेश आरफळकर यांच्या हस्ते तसेच संस्थानच्या वतीने पादुकांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित भाविकांनी हरिनामाचा जयघोष करीत माऊलींच्या चरणी भक्तिभावाने नतमस्तक होत दर्शन घेतले. मंदिरात माऊलींच्या पादुकांची विधिवत महापूजा, आरती आणि महानैवेद्य करण्यात आला. श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांच्या हस्ते पूजाविधी पार पडला. पादुकांना तुळशीहार, पुष्पहार आणि श्रीफळ अर्पण करून परंपरेनुसार पूजा करण्यात आली. आरतीच्या वेळी झालेल्या हरिनामाच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. पालखी सोहळ्याच्या विसाव्याच्या काळात माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मंदिर परिसरात आकर्षक रांगोळी तसेच फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्याने संपूर्ण परिसर लक्षवेधी दिसत होता. रोहिणी परतगुल्ले यांनी आकर्षक रांगोळी साकारली. ट्रस्टच्या वतीने भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त चैतन्य महाराज लोढे कबीरबुवा, विश्वस्त ॲड. रोहिणी पवार, पुरुषोत्तम महाराज पाटील, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब रंधवे चोपदार आदी मान्यवर उपस्थित होते. ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा शाल, उपरणे व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मानकरी राहुल चिताळकर, योगेश आरु, स्वकाम सेवेचे धनंजय गावडे, दामोदर तापकीर, राजेंद्र चौधरी आदी उपस्थित होते. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. माऊलींच्या परतीच्या पालखी सोहळ्यामुळे वडमुखवाडी परिसरात दिवसभर भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.