-कोरेगाव भीमा येथे साहित्य आणण्यासाठी गेल्यानंतर घरी परतलीच नाही; माहिती देण्याचे आवाहन
फुलगाव (अर्जुन मेदानकर) : शिरूर तालुक्यातील आपटी येथील एका विवाहित महिलेचा ४ ऑगस्ट २०२६ रोजी राहत्या घरातून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पती अविनाश भगवान गाडेकर यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे.
सौ. निकिता भगवान गाडेकर (वय ३०, रा. आपटी, ता. शिरूर, जि. पुणे) असे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या ४ ऑगस्ट रोजी “कोरेगाव भीमा येथे ब्लाऊजचे साहित्य आणण्यासाठी जात आहे,” असे घरच्यांना सांगून बाहेर पडल्या होत्या. मात्र त्यानंतर त्या घरी परतल्या नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. तरीही त्यांचा काहीच ठावठिकाणा न लागल्याने शिक्रापूर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली. बेपत्ता महिलेचे शिक्षण बी.कॉम. असून रंग गोरा, उंची सुमारे ४ फूट ८ इंच, चेहरा गोल, नाक सरळ, केस काळे, शरीरयष्टी मध्यम आणि डोळे काळे आहेत. घरातून बाहेर पडताना त्यांनी हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस, हिरव्या रंगाचा स्कार्फ, पायात ग्रे रंगाचे बूट तसेच गळ्यात मंगळसूत्र परिधान केले होते. त्यांच्या गळ्याच्या डाव्या बाजूस तीळ असून त्या मराठी व हिंदी भाषा बोलतात. वरील वर्णनाची महिला कोणाला आढळल्यास किंवा त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने शिक्रापूर पोलीस ठाण्याशी अथवा त्यांचे पती अविनाश भगवान गाडेकर यांच्याशी ७२७६२६६०१७, ९५७८९५२२२२, ८६००९९४८९९ किंवा ९७६६८६००७३ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन शिक्रापूर पोलिसांनी केले आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत.