-राष्ट्रसंत एकनाथ महाराज लोमटे यांच्या प्रेरणादायी प्रवचनातून व्यसनमुक्ती व एकात्मतेचा संदेश
देऊळगाव राजा (अशोक इंगळे) : ऐतिहासिक नगरी देऊळगाव राजात रविवारी सकाळी श्री बालाजी महाराजांची विधिवत पूजा करून राष्ट्रसंत ह.भ.प. एकनाथ महाराज लोमटे यांच्या भव्य प्रवचन व दर्शन सोहळ्याला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. समाजात विशेषतः तरुणांमध्ये वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेवर संतांच्या विचारांमधून सकारात्मक बदल घडू शकतो, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
हा अध्यात्मिक सोहळा डॉ. रामप्रसाद शेळके यांच्या पुढाकारातून आर्या लॉन्स येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी हजारो भाविकांनी उपस्थित राहून संतांचे प्रवचन ऐकले व आशीर्वाद घेतले. प्रास्ताविकात डॉ. रामप्रसाद शेळके यांनी सांगितले की, समाजातील तरुण व्यसनमुक्त व्हावेत आणि संतांच्या विचारांनी प्रेरित होऊन सुसंस्कृत समाज घडावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून येथे जात-पात नसून सर्व समाज एकत्र येऊन मानवतेचा संदेश देतो, असे त्यांनी नमूद केले.
प्रवचनात राष्ट्रसंत एकनाथ महाराज लोमटे यांनी व्यसनमुक्त जीवन, नैतिकता, संस्कार आणि अध्यात्मिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. तरुणांनी दारू, तंबाखू आणि इतर वाईट सवयींपासून दूर राहून शिक्षण, समाजसेवा आणि राष्ट्रनिर्मितीकडे आपली ऊर्जा वळवावी, असे त्यांनी मार्गदर्शन केले. व्यसनामुळे माणसाचे आरोग्य, कुटुंब आणि भविष्य धोक्यात येते, त्यामुळे तरुणांनी संतांचा मार्ग स्वीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाबाबत आमदार मनोज कायंदे यांनी मनोगत व्यक्त करत सांगितले की, राष्ट्रसंत एकनाथ महाराज लोमटे यांच्या आशीर्वादामुळे अनेक तरुणांना व्यसनमुक्तीची दिशा मिळेल. डॉ. रामप्रसाद शेळके यांनी केलेल्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल त्यांनी कौतुक व्यक्त केले.
माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनीही मनोगतात सांगितले की, संतांचे विचार समाजात बंधुभाव निर्माण करतात. संत हे कोणत्याही एका जाती-धर्माचे नसून संपूर्ण समाजासाठी असतात. तरुण पिढी व्यसनांपासून दूर राहिली तरच समाज सुदृढ होईल. यावेळी महाराष्ट्रातील प्रख्यात कवी व निवेदक अजीम नवाज राही यांना साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रसंत एकनाथ महाराज लोमटे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यांच्या प्रभावी निवेदनातून संतांच्या विचारांचा संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचवण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित भाविकांसाठी पिण्याचे पाणी, फराळ, नाष्टा व प्रसादाचे वितरण करण्यात आले. या प्रवचन सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमास आमदार मनोज कायंदे, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी आमदार तोताराम कायंदे, प्रकाश गीते, दिलीप खरात, सुजित गुप्ता, संतोष खांडेभराड, गंगाधर जाधव यांच्यासह वारकरी संप्रदायातील मंडळी व हजारो भाविक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी पोलीस प्रशासनानेही सहकार्य केले.