– उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांचे आवाहन
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकर्यापर्यंत जलद व गतिमान परिणामकारकरित्या पोहचविता यावा, याकरिता कृषी क्षेत्रासाठी सर्व समावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अॅग्रीस्टॅक (डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर एग्रीकल्चर) योजना राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सिंदखेडराजा उपविभागातील जास्तीत जास्त शेतकर्यांची नोंदणी करून शेतकर्यांचे फार्मर आयडी तयार करण्यासाठी यंत्रणेने नियोजन करावे, असे निर्देश उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांनी दिले आहे.
सिंदखेडराजा उपविभागातील शेतकर्यांना केंद्र व राज्य शासनाद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ सुलभ, पारदर्शक पद्धतीने तसेच वेळेत उपलब्ध करणे, शेतकर्यांना पीककर्ज, पीकविमा, किसान क्रेडिट कार्ड, हवामान अंदाज, पीएम किसान योजनेचे अनुदान, उच्च गुणवत्तेची कृषी निविष्ठा, विपणन, स्थानिक आणि विशिष्ट तंत्राचे मार्गदर्शन उपलब्ध करून देत शेतकर्यांना विविध योजनांचा लाभ जलदगतीने देण्यासाठी प्रत्येक शेतकर्यांची अॅग्रीस्टॅक नोंदणी करत प्रत्येक शेतकर्याला एक फार्मर आयडी मिळणार आहे. शेतकर्यांना आपला फॉर्मर आयडी हा स्वतः सेल्फ रजिस्ट्रेशन मोडद्वारे तयार करण्याची ऑनलाईन सुविधा mhfr.agristack.gov.in/farmer -registry-mh या संकेतस्थळावरून शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे. तरी सिंदखेडराजा उपविभागातील सर्व शेतकरी बांधवांनी अॅग्रीस्टॅक या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले फॉर्मर आयडी लवकरात लवकर तयार करून घ्यावेत, असे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले आहे.