– खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाण्याचे एकूण नियोजन पाहाता, लाभ क्षेत्राबाहेर पाणी देणे तूर्त शक्य नाही!
– भविष्यात नळगंगा-वैनगंगाचे अतिरिक्त पाणी आल्यास पाणी सोडण्याची दिली ग्वाही!
– खडकपूर्णा प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या लेखीपत्रावर शेतकर्यांनी उपोषण आंदोलन घेतले मागे!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाण्याचे एकूण नियोजन पाहाता, लाभ क्षेत्राबाहेर पाणी देणे तूर्त शक्य नाही. तसेच, शासनस्तरावर नळगंगा-वैनगंगाचे नदीजोड प्रकल्पाचे प्रयत्न सुरू आहेत, या प्रकल्पाचे अतिरिक्त पाणी आल्यास पाणी सोडण्याची ग्वाही देत, खडकपूर्णा प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या समजुतीच्या लेखीपत्रावर सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा व केशव शिवणी येथील लघु प्रकल्पात प्राणांतिक उपोषण तसेच साखळी उपोषणाला बसलेल्या शेतकर्यांनी आपले उपोषण आंदोलन आज (दि.२७) सायंकाळच्या सुमारास मागे घेत सोडले.
खडकपूर्णा धरणातील टप्पा क्रमांक तीनमधून केशव शिवणी धरणक्षेत्रात पाणी सोडण्यात यावे, या मागणीकरिता शेतकरी शेख हन्नान शेख रसूल (वय ५५), रा.मलकापूर पांग्रा हे काल दि.२६ जानेवारी सायंकाळी साडेसात वाजेपासून केशव शिवणी धरणाच्या पात्रात मलकापूर पांगरा शिवारात आमरण उपोषणास बसले होते. त्यांच्यासोबत भगवान शमा गावंडे (वय ७८), अनिल दिनकर ससाने, भगवान रामभाऊ आटोळे (वय ६०) जयतुल्लाखा यासीन खा पठाण (वय ५०), अन्सारखा सुभान खा पठाण (वय ३४) सर्व रा. मलकापूर पांग्रा हेदेखील साखळी उपोषणास बसले होते. मलकापूर पांग्रा धरण व केशव शिवणी धरणात खडकपूर्णा धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडून तुडूंब भरण्यात यावे, उपसा सिंचन टप्प्याद्वारे आंचरवाडी माथा, अंढेरा, गुंजाळापासून मलकापूर पांग्रा शिवारातून उगम पावणार्या नद्यांना तात्काळ पाणी सोडण्यात यावे, अशा मागण्या आंदोलक शेतकर्यांनी केल्या होत्या. त्यासाठी २६ जानेवारीपासून अन्नत्याग आंदोलन व साखळी उपोषणही सुरू केले होते. परंतु, खडकपूर्णा प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी या शेतकर्यांना लेखी पत्र देत कळवले, की खडकपूर्णा प्रकल्पात १६०.६०६ दलघमी पाणीसाठा असून, चिखली, देऊळगावराजा व सिंदखेडराजा तालुक्यातील १९०४७ हेक्टर सिंचनक्षेत्र सिंचनाखाली येते. पिण्याच्या पाण्यासाठी ५.९३ दलघमी प्रकल्पीय पाणी वापर असून, शासनस्तरावरून आतापर्यंत ४०.५३ दलघमी पिण्यासाठी पाणी आरक्षणानुसार मंजूर झालेले आहे. त्यामुळे अतिरिक्त ३४.६ दलघमी पिण्याचे पाणी आरक्षणामुळे अस्तित्वातील ७६१२ हेक्टर सिंचन क्षेत्रामध्ये कपात होत आहे. सद्यस्थितीत नळगंगा-वैनगंगा नदीजोड प्रकल्पाचे नियोजन सुरू असून, त्यामधून अतिरिक्त पाणी उपलब्ध झाल्यास आपल्या मागणीप्रमाणे पाणी पुरवणे शक्य होईल, असे पोकळ आश्वासनही या शेतकर्यांना देण्यात आलेले आहे. खडकपूर्णा प्रकल्पाच्या सद्यस्थितीतील एकूण पाण्याचे नियोजन बघता प्रकल्पाच्या लाभक्षेत्राबाहेर पाणी देणे शक्य नाही. तरी, आपण केलेली मागणी प्रकल्पाच्या व्याप्तीबाहेर असल्याने भविष्यात अतिरिक्त पाणी उपलब्ध झाल्यास आपल्या मागणीचा विचार करता येईल, असे नमूद करून या शेतकर्यांचे उपोषण आंदोलन गुंडाळण्यात खडकपूर्णा प्रकल्प अधिकार्यांना त्यांच्या स्तरावर यश आले आहे.
खडकपूर्णा धरणातून टप्पा क्रमांक तीनमधून केशव शिवनी धरण क्षेत्रामध्ये पाणी सोडण्यात यावे, या लढ्यासाठी सर्वच स्तरातून त्यांना जोरदार पाठिंबादेखील मिळाला होता. संत चोखासागर (खडकपूर्णा) जलाशयातून डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्यात यावे व ते पाणी सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा व केशव शिवणी येथील लघु प्रकल्पात सोडून हे प्रकल्प तुडुंब भरावे, अशी मागणी दि. १३ जानेवारीरोजी मलकापूर पांगरा, केशव शिवणी या गावांतील शेकडो शेतकर्यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली होती. शेतकर्यांनी निवेदनात नमूद केले होते, की उपसा सिंचन टप्प्याद्वारे अंचरवाडी माथा, अंढेरा, गुंजाळापासून मलकापूर पांगरा शिवारातून उगम पावणार्या नद्यांना तात्काळ पाणी सोडण्यात यावे, तसेच या भागामध्ये जे काही नदीनाल्या ओढे असतील त्यांचे युद्धपातळीवर सर्व्हे करून शासन स्तरावर धोरण आखून त्वरित पाणी सोडून, या नदी नाले प्रकल्प, केटी पाझर तलाव, तात्काळ भरण्यात यावे. पाणी परत नदी नाल्याद्वारे पुन्हा तडेगाववरील खडकपूर्णा नदीला मिळेल. या पट्ट्यातसुद्धा भीषण दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या दोन महिन्यापासून तीव्र पाणीटंचाई भीषण दुष्काळग्रस्त स्थिती झाली असून, जीवसृष्टी पाण्यावाचून तडफडत आहे. पिण्याच्या पाण्यासह रब्बी पिकेसुद्धा घेण्यासाठी पाणी नाही. गेल्या ३० वर्षापासून अनेक शेतकरी पाणी सोडण्यात यावे, या मागणी करता लढा उभारत आहे. त्यामुळे संत चोखामेळा धरणातून उपसा सिंचनाद्वारे पाणी देऊन परिसरातील लघु प्रकल्प, केटी बाजार, तलाव जलाशय भरावे, अन्यथा २५ जानेवारीला मलकापूर पांगरा व केशव शिवणी लघु प्रकल्प भरले नाही तर दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी केशव शिवणे धरण क्षेत्रात सर्व शेतकरी मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलनाला बसतील, असा इशारा शेतकर्यांनी या निवेदनाद्वारे दिला होता. परंतु, खडकपूर्णा प्रकल्पाच्या अधिकार्यांनी पाणी न सोडता, निव्वळ लेखी समजुतीवर हे उपोषण सोडले आहे.