– छत्रपती संभाजीनगरतील ट्रक चालकाच्या निर्घृण खुनात लोणार तालुक्यातील तिघांच्या मुसक्या आवळल्या
– अहिल्यानगरमधील ट्रकचालकाला झोपेतच टॉमीने डोके ठेचून ठार मारले!
लोणार (वाजिद खान) – कर्जबाजारी झाल्याने ट्रक लुटण्याच्या उद्देशाने त्याने ट्रक चालकाचा खून केला. मृतदेह ट्रकमधील टूल बॉक्समध्ये टाकला. अन् ट्रक घेऊन ट्रकमधील सामान विकण्याच्या उद्देशाने तो सुसाट निघाला.. मात्र एवढ्या धावपळीतदेखील त्याचे प्रेयसीसोबत बोलणे सुरू होते. अशातच त्याचा मोबाईल स्वीचऑफ झाला.. म्हणून त्याने खून केलेल्या ट्रक चालकाच्या फोनवरून प्रेयसीसोबत गप्पा मारल्या.. या प्रेयसीसोबत मारलेल्या गप्पांवरूनच छत्रपती संभाजीनगरात या बड्या हत्याकांडाचा उलगडा झाला. ट्रक चालकाचा खून करणारा हा तरूण लोणार तालुक्यातील सुलतानपूरचा राहणार असून, त्याचे नाव गणेश वसंता पवार असे आहे. छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी त्याचे दोन साथीदार गणेश गजानन कुटे (सुलतानपूर) आणि ज्ञानेश्वर गणेश घायाळ (रा. गायखेडा, ता.लोणार) यांनादेखील अटक केली आहे. विजय मुरलीधर राऊत (५२, रा. केडगांव, अहिल्यानगर) असे खून झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील आडगांव बुद्रूकमध्ये सोलापूर – धुळे महामार्गावर एक ट्रक बेवारस अवस्थेमध्ये आढळला होता. पोलिसांनी तपासणी केली असता ट्रकच्या टूल बॉक्समध्ये चालक राऊत यांचा मृतदेह आढळला. मृतदेहावर गंभीर मारहाणीच्या खुणा होत्या. त्यामुळे ट्रकचालकाचा खून झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. ट्रकमध्येच पोलिसांना राऊत यांचा मोबाईलदेखील सापडला. या मोबाईलवरून एकाच व्यक्तीला ११ कॉल गेल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याच्या खोलात गेल्यानंतर पोलिसांनी सुलतानपूरच्या गणेश पवार याला अटक केली. आधी उडवाउडवीची उत्तरे देणार्या गणेशने नंतर मात्र खुनाची कबुली दिली. छत्तीसगडमधील रायपूरमध्ये विजय राऊत यांनी ट्रकमध्ये अडीच हजार किलो लोखंड भरले. ते घेऊन ते अहिल्यानगरला येणार होते. रायपूरमध्येच बदली चालक म्हणून काम करणार्या गणेश पवारने विजय राऊत यांना मेहकरपर्यंत सोडण्याची विनंती केली. दि. १९ जानेवारीला ते रायपूरमधून निघाले. सोमवारी सकाळी १० वाजता विजय राऊत आणि गणेश पवार यांनी कारंजामध्ये नाष्टा केला. त्यानंतर स्वतः गणेश पवारने ट्रकचे स्टेरिंग हाती घेत विजय राऊत यांना आराम करायला सांगितले. विजय राऊत झोपेत असतानाच गणेश पवारने टॉमीने डोके ठेचून राऊत यांची हत्या केली. गणेश ट्रक घेऊन मेहकरजवळ आला, तिथे त्याचे मित्र घायाळ आणि कुटे त्याला मिळाले. मेहकरमध्येच त्यांनी ३० हजारात ३० क्विंटल सळ्या विकल्या. त्यानंतर तिघेही ट्रक घेऊन जालन्याच्या दिशेने निघाले. जालन्यात त्यांना खरेदीदार मिळाला नाही. म्हणून ते छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने निघाले. दरम्यान, तोपर्यंत विजय राऊत यांची हत्या करून बराच काळ झाल्यामुळे ट्रकमध्ये दुर्गंधी सुटली. ट्रकमध्ये रूम प्रâेशनर मारत ते संभाजीनगरकडे निघाले. मात्र ट्रकमधील मालाला खरेदीदार मिळत नसल्याने ट्रक रस्त्यात सोडून तिघेही गावाकडे निघून गेले.
विजय राऊत यांची हत्या करणारा गणेश पवार हा ट्रकवर बदली चालक म्हणून काम करतो. तो कर्जबाजारी आहे. राऊत आणि गणेश पवार यांची कामानिमित्ताने अनेकदा भेट होत असते. दि.१९ जानेवारीला रायपूरमध्ये दोघांची भेट झाली. राऊत यांना अडीच हजार किलो लोखंडाच्या ट्रान्सपोर्ट चे काम मिळाल्याचे गणेशने पाहिले. तेव्हाच त्यांनी या लोखंडावर डल्ला मारण्याचा कट रचला. त्यासाठीच त्याने राऊत यांची हत्या केली. मात्र गणेश पवार हा त्याच्या लफडेबाज स्वभावामुळेच अडकला. प्रवासात गणेश पवारचा मोबाईल स्वीचऑफ झाला होता. त्यामुळे त्याने राऊत यांच्या फोनवरून प्रेयसीला ११ कॉल केले. पोलिस तपासात ही बाब समोर आल्यानंतर गणेशचा कारनामा समोर आला. शिवाय, टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्येदेखील गणेश हा राऊत यांच्यासोबत असल्याचे कैद झाले होते.