– महाप्रसादाची तयारी अंतिम टप्प्यात; शेकडो महिला व पुरूष स्वयंसेवकांचा महाप्रसाद बनविण्यात सहभाग
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – श्री क्षेत्र वरोडी येथील परमहंस श्री तेजस्वी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त उद्या (दि.९) महाप्रसादाचे वाटप केले जाणार असून, त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. उद्या १५१ क्विंटल गव्हाची पुरी आणि १०० क्विंटल वांगे भाजीचा महाप्रसाद वाटप होईल. त्यासाठी शेकडो महिला व पुरूषांनी आज महाप्रसाद तयार करण्यास सुरूवात केली होती.

ग्रामीण भागातील सिंदखेडराजा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले श्रीक्षेत्र वरोडी हे गाव परमहंस श्री तेजस्वी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झाले आहे. तेजस्वी महाराज यांच्या जीवन चारित्र्याचा परिचय जेव्हा मिळायला लागला, तेव्हापासून महाराज श्रींचा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येत आहे. आज या सोहळ्याला ३७ वर्षे झाले असून, बाबांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आहे. बाबांचा ८९ वा जन्मोत्सव सोहळा साजरा होत असून, ९ डिसेंबररोजी लाखो भाविक येथे येतात आणि बाबांच्या चरणी नतमस्तक होतात. येणार्या भाविकांना महाप्रसाद वितरण करण्यासाठी ७ डिसेंबरपासून महाप्रसाद तयार करण्यासाठी परिसरातील सेवाधारी महिला व पुरुष स्वंयम सेवकांनी हजेरी लावली आहे.
१५१ क्विंटल गहू पुरी आणि १०० क्विंटल वांगेभाजी या महाप्रसादाचे वितरण उद्या हजारो भाविकांना होणार आहे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी ७ डिसेंबररोजी रात्री श्री तेजस्वी महाराज संस्थानला भेट दिली असून, महाप्रसाद तयारीसंबंधी आढावा घेतला आहे. उद्या सकाळी ९ वाजता अनिरुद्ध महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. त्या अगोदर गावातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यावेळी शेकडो दिंड्या सहभागी होणार असून, आज वरोडी येथे अनेक गावांतून दिंड्याचे आगमन झाले आहे. महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण गारोळे, व्यवस्थापक जनार्दन गुंजकर, उत्सव समितीचे अध्यक्ष माजी कृषी सभापती दिनकरराव देशमुख यांनी केले आहे.
————