– विधानसभा निवडणुकीत केला होता डॉ. शशिकांत खेडेकरांचा प्रचार!
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – सिंदखेडराजा-देऊळगावराजा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मनोज कायंदे यांना अखेर भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजाताई मुंडे-पालवे यांच्या शुभेच्छा मिळाल्या आहेत. मनोज कायंदे, नितीन कायंदेसह टीमने पंकजाताईंची मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली असता, ताईंनी आमदार कायंदेंसह त्यांच्या टीमला भरभरून शुभेच्छा दिल्या, तसेच मतदारसंघातील राजकीय आढावादेखील घेतला. विशेष बाब म्हणजे, ‘मी विजयी होणार्या उमेदवाराच्या प्रचारालाच येते’, असे सांगून पंकजाताईंनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शिंदे गटाचे उमेदवार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्यासाठी मते मागून, त्यांचा प्रचार केला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ व धनंजय मुंडे यांनी मनोज कायंदे यांच्यासाठी प्रचारात उडी घेत, त्यांच्या निर्णायक विजयात सिंहाचा वाटा उचलला होता.
विधानसभा निवडणुकीत महायुतीने देदीप्यमान यश मिळाविल्याबद्दल नवनिर्वाचित आमदार मनोज कायंदे व त्यांच्या सहकार्यांनी भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस आ. पंकजा मुंडे-पालवे यांची मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत मनोज कायंदे, सतिश कायंदे, शेतकरी नेते नितीन कायंदे यांच्यासह त्यांचे सहकारी उपस्थित होते. याप्रसंगी पंकजाताईंनीदेखील मनोज कायंदे यांचा आमदार म्हणून विजयी झाल्याबद्दल यथोचित सत्कार केला. तसेच, नजीकच्या काळात सहकार्याची ग्वाही दिली.
यावेळी झालेल्या औपचारिक गप्पांतून त्यांनी मतदारसंघातील राजकीय माहितीदेखील जाणून घेतली. स्व. देवानंदजी कायंदे यांच्या स्मृतींनाही उजाळा दिला. तसेच, नजीकच्या काळात सर्वतोपरी मदतीचे आश्वासनही दिले. पंकजा मुंडे-पालवे यांची राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात वर्णी लागणे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे मतदारसंघातील विकासकामांत त्यांचा निश्चित हातभार लागेल, असा विश्वास याप्रसंगी सर्वांनी व्यक्त केला आहे.
———-
माँ जिजाऊंचे स्मरण व स्वर्गीय वडिलांना अभिवादन करून; मनोज कायंदे यांनी घेतली आमदारकीची शपथ!